खड्डेमुक्त शहर करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 23:33 IST2021-02-01T23:32:33+5:302021-02-01T23:33:05+5:30
मनपा आयुक्त अजिज शेख यांनी माहिती

खड्डेमुक्त शहर करण्याचा प्रयत्न
चंद्रकांत साेनार
महानगरातील रस्ते, सांडपाण्याची विल्हेवाट व दिवसाआड पिण्याचे पाणी असे प्रश्न सोडविण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. भुमिगत गटारीचे काम अठरा महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे धुळेकरांना होणारी अडचण समजू शकतो. आणखी काही महिने त्रास सहन करावा लागू शकतो. भूमिगत गटारीच्या कामासाठी खराब झालेले ३५ किमीचे रस्ते दुरूस्त केले जाणार आहे. सध्या १० किमीचे रस्ते दुरूस्त केले आहेत. उर्वरीत रस्ते सुध्दा दुरूस्त केले जाणार आहे. तसेच काही रस्ते मनपामार्फत केले जाणार आहे. अशी माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली.
प्रश्न : रस्ते व भुमिगत गटारीसाठी किती
निधी प्राप्त झाले आहे.
उत्तर : राज्य नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेले काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. यासाठी १०१. २९ कोटीचा निधी मंजुर झाला आहे. यात ७० टक्के राज्य शासन व ३० टक्के मनपा हिस्सा समाविष्ट आहे. आतापर्यंत सुमारे ७ किमीचे रस्ते पूर्ण तयार झाले आहेत. तर १५ किमी गटारीचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेमध्ये राज्याचा २३.३९ कोटी तर मनपाचा ५ कोटी असा एकूण २८. ३९ कोटी निधी प्राप्त आहे.
प्रश्न : रस्ते व गटारीच्या कामासाठी किती दिवसांची मुदत देण्यात आली होती
उत्तर : महानगरातील भुमिगत गटार, रस्ते अशा कामांसाठी ठेकेदारास अठरा महिन्याचा कालावधी दिला होता. या कालावधीत त्यांना हे काम मार्गी लावणे होते. मात्र मध्यतंरी कोरोनाच्या काळात मजूर आपल्या गावी गेल्याने काम बंद पडले. त्यामुळे या कामासाठी विलंब लागला. साधारण ८ ते १० महिन्याचा कालावधीत काम मार्गी लागले अशी अपेक्षा आहे.
प्रश्न : मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे ?
उत्तर : महानगरातील रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. याची आम्हाला जाणीव आहे. परंतु योजना पूर्ण झाल्यानंतर पुढील अनेक वर्षांसाठी पाणीपुरवठा, ड्रेनेज व रस्ते आदी सुविधांचा लाभ कायमस्वरूपी होणार आहे. मनपाच्या अर्थ संकल्पात या पायाभुत सुविधा वाढविण्यासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात धुळेकरांचे मुलभुत प्रश्न नक्की सुटतील
मनपाच्या कामांची गुणवत्ता तपासणी होते
महानगरात सुरू असलेल्या विकास कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्र व राज्य शासन मार्फत दिल्ली, मुंबई, हैद्राबाद येथील संस्थांची त्रयस्त संस्था नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
त्या ठेकेदारांना दिल्या नोटीसा
भूमिगत गटार योजनेबाबत काही सदस्यांचा व नागरीकांच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झालेल्या आहेत. त्याबाबत ठेकेदारांना नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना सुध्दा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वर सांगितल्यानुसार दरमहा बैठक घेऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बैठकीला आवश्यकतेप्रमाणे नगरसेवकांना सुध्दा बोलविण्यात येते असल्याची माहिती आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.