एकाचवेळी गर्दीमुळे लहान पुलावरील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST2021-04-27T04:36:49+5:302021-04-27T04:36:49+5:30
धुळे : पांझरा नदीवरील इतर सर्व पुलांची वाहतूक बंद केल्याने सोमवारी लहान पुलावर एकाचवेळी गर्दी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली ...

एकाचवेळी गर्दीमुळे लहान पुलावरील वाहतूक ठप्प
धुळे : पांझरा नदीवरील इतर सर्व पुलांची वाहतूक बंद केल्याने सोमवारी लहान पुलावर एकाचवेळी गर्दी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजता बंद करण्याचे आदेश आहेत. ११ वाजेनंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. प्रसंगी पोलिसांचा लाठीचा प्रसादही मिळत आहे. त्यासाठी इतर सर्व पुलांवर बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सोमवारी सकाळी गावातील खरेदीचे काम आटोपल्यानंतर आपआपल्या घरी परतण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली. शहरातून देवपुरात येणाऱ्यांचे आणि जाणाऱ्यांची वाहने एकाचवेळी लहान पुलावर आली. तसेच आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अधिकारी कर्मचारींची वाहनेदेखील याचवेळी आली. त्यामुळे पुलावर दोन्ही बाजुने वाहनांची गर्दी झाली आणि पावणेअकरा वाजता पुलाची वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.
वाहतूक ठप्प झाल्याने विनाकारण फिरणाऱ्यांचेदेखील फावले. पोलीस यंत्रणा वाहतूक सुरळीत करण्यात गुंतल्याने चाैकशीचे काम बाजुला पडले. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना सहज निसटता आले. सोमवारी लहान पुलावर झालेल्या गर्दीमुळे नागरिकांना दररोज खरेदी करण्याची गरज का भासते असा प्रश्न पोलिसांना देखील पडला.