पारंपरिक नृत्याविष्काराने आणली रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 15:41 IST2017-09-25T15:39:41+5:302017-09-25T15:41:56+5:30
उत्सव चैतन्याचा : चित्तवेधक वेशभूषेने वेधले भाविकांचे लक्ष; सुप्त कलागुणांचे उत्कृट सादरीकरण

पारंपरिक नृत्याविष्काराने आणली रंगत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नवरात्रोत्सवानिमित्ताने शहरातील विविध भागात गरबा-दांडिया नृत्यात तरुणाई बेधूंद झाली आहे. विविध गाण्यांवर किंवा पारंपारिक वाद्याच्या निनादात तरुणांसह अबालवृद्धही ठेका धरत असून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा उत्कृष्ट कलाविष्काराचे सादरीकरण ठिकठिकाणी होत असल्यामुळे नवरात्रोत्सवात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
विविध गाण्यांवर धरला ताल
तरुण, तरुणी गुजराती, मराठी आणि हिंदी गीतांवर गरबा, दांडिया नृत्य सादर करत आहेत. ‘रंगीलो म्हारो़ ढोलना’, ‘पंखिडा रे’, ‘आम्ही काका मामा ना पोर’ व इतर अहिराणी भाषेतील गीतांना अधिक पसंती मिळत आहे़
चित्तवेधक वेशभूषा
गरबा व दांडिया नृत्याविष्कार सादर करणारे महिला व तरुणी चित्तवेधक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करण्यासाठी ठेका धरत आहेत. पुरुष व तरुणांनी पठाणी, चुडीदार, शेरवाणी, पगडी, जीन्स आदी पेहराव करण्यावर भर देत आहेत. शहरातील नित्यानंद नगर आणि अग्रवाल नगरात, जयहिंद कॉलनी, देवपूर परिसर, चित्तोड रोड, कुमारनगर आदी विविध भागांमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याठिकाणी गरबा व दांडिया खेळण्यासाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
रात्री ८ वाजेपासून दांडिया सुरु शहरात दररोज रात्री आठ वाजेपासून तरुणाई, महिला व पुरुष गरबा व दांडिया नृत्य खेळण्यासाठी दाखल होत आहेत. नियमानुसार रात्री दहा वाजेपर्यंत गरबा खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे गरबा नृत्य रंगात आलेले असताना तो थांबवावा लागत आहे. परिणामी, अनेकांचा हिरमोड होत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार अष्टमी व नवमीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत गरबा नृत्य खेळण्यासाठी सूट देण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरातील विविध मंडळांतर्फे सामाजिक उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे.
कार्यक्रमाची रेलचेल
गरबा मंडळातर्फे रात्री गरबा आणि रास दांडिया खेळला जात आहे. त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी गरबा-दांडियासाठी गर्दीचा ओघ वाढलेला दिसत आहे.