ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: November 11, 2023 19:31 IST2023-11-11T19:31:20+5:302023-11-11T19:31:52+5:30

अपघाताची नोंद थाळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली

Tractor blown up, biker killed after hitting road; Incident in Wathoda Shivara | ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना

ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना

देवेंद्र पाठक, धुळे: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील वाठोडा शिवारात बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी अपघाताची नोंद थाळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.

शिरपूर तालुक्यातील वाठोडा शिवारात जैतपूर फाट्याच्या जवळ थाळनेरकडून शिरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. एमएच १८ बीएक्स ४७६४ क्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने येेत असताना समोरून येणारी एमएच १८ एआर ८९६६ क्रमांकाची दुचाकी धडकली. यात सुकलाल धनगर (निळे) (वय ३४, रा. थाळनेर ता. शिरपूर) हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली.

दुचाकीसह ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गंभीर जखमी अवस्थेत सुकलाल धनगर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सुकलाल धनगर यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला. याप्रकरणी प्रवीण छगन निळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरार ट्रॅक्टर चालकाविरोधात शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक डी.बी. पवार घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Tractor blown up, biker killed after hitting road; Incident in Wathoda Shivara