सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालये बांधण्यात आलेली आहे.मात्र गेल्या काही वर्षात या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी शौचालयांना दरवाजे नाहीत. भांडे तुटलेले आहेत. काही ठिकाणी तर पाण्याचीही व्यवस्था नसल्याने दुर्गंधी पसरत असते. सद्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. शाळा सुरू होण्यापूर्वी शौचालयांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
निवडणुका असल्या तेव्हाच होते दुरुस्ती
दोन अथवा चार शिक्षक असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालये बांधण्यात आली. मात्र यातील बहुतांश शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. मात्र निवडणुकीसाठी जिल्हा परिषद शाळांचा वापर होत असतो. तेव्हाच ही शौचालये स्वच्छ केली जातात. इतरवेळी दुरुस्तीसाठी निधीही वेळेवर दिला जात नाही, अशी तक्रार करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी हिताचा विचार होणे गरजेचे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा मिळणे गरजेचे आहे. तालुक्यात सर्वच शाळांमध्ये शाैचालये असली तरी त्यातील अनेक शौचालये ही नावालाच आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शौचासाठी शाळाबाहेरच जावे लागते.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १६९ शाळा असून, त्यापैकी ५० शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. त्यासाठी ५० लाखांच्या निधीची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे. निधी मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
- वैशाली अरुण सोनवणे,
सभापती, पं.स. शिंदखेडा