आपली मुलगी ही वयात आलेली असताना तिच्या गरजा कोणत्या, ती कोणासोबत जास्त वावरताना दिसून येते, पालकांना कोणते कारण सांगून ती घराबाहेर पडते, तिचे मित्र, मैत्रिणी कोण आहेत, यासह अनुषंगिक बाबी आता पालकांनी चोखंदळपणे तपासायला हव्यात. पण, या बाबींची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने अपहरणकर्त्यांना ते सोईचे ठरत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
गत वर्षीच्या तुलनेत वाढ
मुलींचे अपहरण करणे, महिलांचा विनयभंग करणे, त्यांच्यावर अत्याचारासारखे प्रसंग ओढवून आणणे अशा घटना या सध्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात एकप्रकारे वाढच झाली आहे. हे रोखण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विकृती मोडीत काढावी
- दिवसेंदिवस अशा प्रकारची विकृती ही मोडीत काढण्याची गरज आहे. पण, ही विकृती नेमकी मोडीत काढणार कोण हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.
- बहुतेकवेळा वयात आलेल्या तरुणी या आमिषाला बळी पडत असतात. त्या बळी पडतात म्हणूनच त्यांचे अपहरण करणे विकृत मनाच्या व्यक्तीला खूपच सोईचे ठरत आहे. त्यात लग्न हेदेखील प्रमुख कारण असल्याचे म्हणावे लागेल.
अल्पवयीन मुली
येतात जाळ्यात
अपहरण करण्याचा उद्देश मनात बाळगणाऱ्या विकृत मनाच्या व्यक्तींना मुलींचे अपहरण करणे सहज शक्य होत असल्याचे समोर येत आहे. यात पालकांचा संवाद हरवत असल्याने ही बाब घडत आहे. आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रमाण कमी न होता वाढत आहे. हे रोखण्यासाठी पालकांनी लक्ष द्यायला हवे.
गुन्ह्यांची उकल ही अल्पच
अपहरण, अत्याचार अथवा पळवून नेण्याच्या घटना घडत असताना त्यांचा शोध लावण्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनीदेखील पोलीस प्रशासनाला साथ दिल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्याची उकल होणे सोपे होऊ शकते.