आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सपोनिसह तीन पोलिसांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 21:58 IST2020-12-11T21:57:53+5:302020-12-11T21:58:46+5:30
मोहन मराठे मृत्यू प्रकरण : तीन पोलिसांना अटक, पंजाबराव राठोड फरार

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सपोनिसह तीन पोलिसांवर गुन्हा
दोंडाईचा : येथील मोहन मराठे या तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह तीन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला़ तिघा पोलिसांना सीआयडीने अटक केली असून पंजाबराव राठोड हे फरार झाले आहेत़
तांदुळ चोरी प्रकरणात मोहन मराठे (३७) या तरुणाला दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ त्यानंतर ७ आॅक्टोबर रोजी शहादा रस्त्यावर त्याचा मृतदेह हा संशयास्पद आढळून आला होता़ मृत मोहनच्या नातलगांनी त्याचे शवविच्छेदन हे दोंडाईचा येथे न करता धुळ्यात करण्याची मागणी केल्याने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी होकार दर्शविला़ ८ आॅक्टोबर रोजी इन कॅमेरा त्याचे शवविच्छेदन करण्यात आले़ तपास हा निपक्ष व्हावा यासाठी प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले़ सीआयडीचे उपअधीक्षक रविकिरण दरवडे यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली़ शवविच्छेदन अहवाल, घेण्यात आलेले जाबजबाब लक्षात घेऊन पोलीस दोषी आढळून आले़
गुन्ह्याची कबुली देण्यासाठी मोहन मराठे याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. फौजदारी कट रचून पुरावा नष्ट करण्याचा वाईट हेतूने मयतास शहादा रस्त्यावर पिरबल्ली जवळ रस्त्यावर अपघात असल्याचे दाखविण्यासाठी टाकून देणे, मानवी शवाची अप्रतिष्ठा करणे, मयतास ताब्यात दिल्याचे खोटे पुरावे सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे, गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना न देणे असे काही महत्वाचे आरोप लावण्यात आले आहेत़ याप्रकरणी संशयित सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह कर्मचारी वासुदेव गोविंद जगदाळे, सीताराम दामू निकम, राहुल नंदलाल सोनवणे यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६, ३४८, २०१, २०२, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील तपास नंदुरबार सीआयडीचे उपअधीक्षक राजेंद्र भावसार करीत आहेत़