धुळे जिल्ह्यातून परीक्षेसाठी ५७ हजार विद्यार्थी प्रविष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 13:30 IST2020-02-10T13:30:14+5:302020-02-10T13:30:38+5:30

दहावी-बारावीची परीक्षा : जिल्ह्यात बारावीची ४४ व दहावीची ६३ केंद्रावर होणार परीक्षा

 Thousands of students are enrolled for exams from Dhule district | धुळे जिल्ह्यातून परीक्षेसाठी ५७ हजार विद्यार्थी प्रविष्ठ

धुळे जिल्ह्यातून परीक्षेसाठी ५७ हजार विद्यार्थी प्रविष्ठ

आॅनलाइन लोकमत
धुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये घेण्यात
येणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. इयत्ता बारावीसाठी २५ हजार ३१९ तर इयत्ता दहावीसाठी ३१ हजार ८३६ विद्यार्थी असे दोन्ही परीक्षा मिळून ५७ हजार १५५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी २ हजार ८३ विद्यार्थी जास्त आहेत.
इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधित होणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
बारावीसाठी ४४ केंद्र
जिल्ह्यात ४४ केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये सात, धुळे ग्रामीणमध्ये १४, साक्री तालुक्यात नऊ शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी सात-सात अशा एकूण ४४ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
दहावीसाठी ६३ केंद्र
दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये १३, धुळे ग्रामीणमध्ये १७, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात नऊ व शिंदखेडा तालुक्यात ११ अशा एकूण ६३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
५७ हजार १५५ विद्यार्थी परीक्षा देणार
बारावीची परीक्षा २५ हजार ३१९ तर दहावीची परीक्षा ३१ हजार ८३६ असे एकूण ५७ हजार १५५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत.
दरम्यान गेल्यावर्षी बारावीसाठी २५ हजार ३५७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर दहावीसाठी २९ हजार ७१५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या दोन्ही परीक्षा मिळून यावर्षी २ हजार ८३ विद्यार्थी जास्त आहेत.
सहा भरारी पथकांची नियुक्ती
परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळातर्फे सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायटच्या प्राचार्या तसेच डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या व प्रभारी उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
परीक्षा केंद्रावर बैठे पथक
जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांचे बैठे पथक राहणार आहे.
दरम्यान संबंधित विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख हे ज्या तालुक्यात कार्यरत आहे, त्या तालुक्यात त्यांना नियुक्त करण्यात येऊ नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात जवळपास १५ अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र असून, त्याठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही अधिकाºयांनी दिल्या आहेत.
आठ ठिकाणी कस्टडी
प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर व ग्रामीणसाठी ३ कस्टडी, साक्री तालुक्यासाठी दोन कस्टडी, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, शिंदखेडा तालुक्यासाठी २ कस्टडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Thousands of students are enrolled for exams from Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.