रणरणत्या उन्हात होतेय तृष्णातृप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:20+5:302021-03-26T04:36:20+5:30

उन्हाळा लागला की अनेक संस्था आणि मंडळे मोफत पाणपोईचा सेवाभावी उपक्रम सुरू करतात. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील शहरात ठिकठिकाणी पाणपोयी ...

Thirst is satisfied in the hot sun | रणरणत्या उन्हात होतेय तृष्णातृप्ती

रणरणत्या उन्हात होतेय तृष्णातृप्ती

उन्हाळा लागला की अनेक संस्था आणि मंडळे मोफत पाणपोईचा सेवाभावी उपक्रम सुरू करतात. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील शहरात ठिकठिकाणी पाणपोयी सुरू झाल्या आहेत. शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या चाैकांमध्ये रोटरी क्लबसारख्या काही मोठ्या संस्थांनी कायमस्वरूपी पक्क्या पाणपोई बांधल्या आहेत. काही ठिकाणी पाणी आहे तर काही ठिकाणी मात्र पाणीच नसल्याने पाणपोई नावालाच आहेत. आता उन्हाळा लागल्याने या पाणपोई सुरू करण्याची आवश्यकता आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर नेहमीप्रमाणे पाणपोई अजून सुरू झालेल्या नाहीत. परंतु जसजसा उन्हाळा तीव्र होईल तसतशी पाणपोईंची संख्या वाढेल, असा अनुभव आहे. परंतु यंदा कोरोनामुळे पाणपोईंची संख्या घटण्याची शक्यता आहे.

काही मंडळांनी मात्र नेहमीप्रमाणे पाणपोई सुरू केल्या आहेत. परंतु आता या पाणपोईंमध्ये पारंपरिक मातीच्या माठांची जागा थंड पाण्याच्या जारने घेतली आहे. पादचाऱ्यांसह, कामगार, कष्टकरी, फेरीवाले, प्रवासी, विद्यार्थी अशा साऱ्यांनाच तलान भागविण्यासाठी पाणपोईंचा आधार मिळाला आहे. ग्रामीण भागात बस थांब्यांजवळ पाणपोई सुरू होत आहेत. बसची वाट पाहणाऱ्या किंवा खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी देखील या पाणपोई तहान भागविणाऱ्या ठरतात. सेवाभावी संस्थांनी गरज ओळखून पाणपाेई सुरू कराव्यात, अशी अपेक्षा आहे.

देवपुरातील नेहरू चाैकात हरिओम मित्र मंडळातर्फे मोफत पाणपोई बाराही महिने सुरू आहे. थंड पाण्याचे १०० जार दररोज लागतात. या ठिकाणी दवाखाने आहेत, बसेस थांबतात, इतर प्रवासी वाहनेही थांबतात, बाजारकरूंची आणि एकवीरा देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. या साऱ्यांची तहान पाणपोईमुळे भागते.

धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वकील संघाने पाणपोई सुरू केली आहे. जिल्हा न्यायालयात जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी असते. दुपारच्या वेळी तहान भागविण्यासाठी पाण्याची शोधाशोध होते. परंतु या पाणपोईमुळे कोर्टात येणाऱ्यांची तहान भागते आहे.

कोरोना नियमांचे पालन व्हावे

पाणपोईच्या ठिकाणी पूर्णवेळ कुणाचेही नियंत्रण नसते. तहानलेल्या व्यक्तीला स्वत: पाणी घेऊन प्यावे लागते. रस्त्याने जाणारा कुणीही व्यक्ती पाणी पितो. येथील ग्लासला आणि जारला अनेकांचा स्पर्श होतो. त्यामुळे पाणपोईच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. सॅनिटायझरची व्यवस्था केली पाहिजे. पाणी पिण्यासाठी येणाऱ्यांनी देखील हात सॅनिटाईझ केल्याशिवाय जारला किंवा ग्लासला स्पर्श करू नये, अशी जनजागृती आवश्यक आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी.

Web Title: Thirst is satisfied in the hot sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.