शिरपूरला कृषी दुकानात तिसऱ्यांदा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:44+5:302021-06-18T04:25:44+5:30
शिरपूर : शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्ससमोरील श्रीपाद कृषी विकास केंद्रात गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा चोरट्यांनी डल्ला मारला़ दुकानाच्या पत्र्याचे ...

शिरपूरला कृषी दुकानात तिसऱ्यांदा चोरी
शिरपूर : शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्ससमोरील श्रीपाद कृषी विकास केंद्रात गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा चोरट्यांनी डल्ला मारला़ दुकानाच्या पत्र्याचे स्क्रू खोलून अज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटांत १ लाख ४१ हजार १२८ रुपये किमतीचे कापसाचे बियाणे चोरून नेले़ सदर आरोपी दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. गेल्या १८ मे रोजीदेखील चोरट्याने संगणक संच लांबविले होते़ या चोरीचे देखील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना चोरांचा शोध लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
९ जून रोजी रात्री ९ ते ९.२० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे पत्र्याचे स्क्रू खोलून पत्रा उचकावून आत प्रवेश केला़ अज्ञात चोरट्याने दुकानात घुसण्यापूर्वी अंगातील शर्ट तोंडाला बांधून प्रवेश केला आहे़ त्यामुळे तो अर्धवट उघडा दिसतो़ त्याने निळ्या रंगाची जिन्स घातली आहे़ सदर युवक हा २५ ते ३० वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. चोरट्याने २० मिनिटांत १ लाख ४१ हजार १२८ रुपये किमतीचे कापूस बियाणांची पाकिटे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली़
याबाबत दुकानमालक नितीन भय्यासाहेब पाटील, रा़ प्लॉट नंबर ५९, सरस्वती कॉलनी, शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सीसीटीव्हीत काय दिसले?
१८ मे रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकावून आत प्रवेश केला होता़ सदर चोरट्याने तोंडाला रूमाल बांधला असून दुकानात तो एकटा तब्बल अर्धा तास शोधाशोध करतो़ कपाटाच्या ड्राॅवरमध्ये काहीच मिळत नसल्यामुळे वैतागतो़ कपाटातील ड्राॅवर उघडूनही हाती काहीच मिळत नसल्यामुळे टेबलावर ठेवलेल्या संगणकाच्या वायर तोडून संगणकाचे २ संच चोरून नेल्याची घटना घडली होती़ सोबत प्रिंटरसुध्दा त्या भुरट्या चोरट्याने चोरून नेले आहे़ विशेषत: कपाटाच्या एका ड्राॅवरमध्ये संपूर्ण दुकानाच्या नोंदी असलेला डाटा म्हणजेच हार्डडिक्ससुद्धा त्या चोरट्याने चोरून नेली आहे़ दुकानातील लाखो रुपयांच्या व्यवहाराच्या नोंदी असलेली हार्डडिक्स चोरट्यांने लांबविल्यामुळे नेमकी कोणत्या शेतकऱ्यांकडे किती रुपये बाकी आहे, ती सर्व माहिती गेल्याने दुकानदार नितीन पाटील हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत़
दोघे संगणक व हॉर्डडिक्स असे तिघांमध्ये हा डाटा असायचा़ नेमके घटनेच्या आदल्या दिवशी ती हॉर्डडिक्स दुकान बंद केल्यानंतर घरी घेऊन जाण्याचा विसर पडल्यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागणार आहे़
१८ रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानातील संगणक संच गायब झाल्याचे दिसताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली़ पोलिसांनी देखील काही क्षणातच घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली़ भुरट्या चोरट्यासोबत आणखी काही साथीदार आहेत की नाही, त्याचा शोध घेतला जात आहे़ मात्र, दुकानात शिरलेला भुरटा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे़ तो ३० ते ३५ वयोगटातील असून त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट तर ऑफव्हाइट पँड घातली आहे़ पोलिसांनी हे फुटेज पाहून शोध घेतला. मात्र, अद्यापपर्यंत काहीच धागेदोरे लागले नाहीत़
१८ मे पूर्वीदेखील याच दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ८ ते १० हजार रुपयांची चिल्लर चोरून नेली होती़ एंकदरीत या दुकानात अवघ्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा चोरट्यांनी दुकान फोडले़