प्रातांधिकारी यांच्या घरी चोरट्यांची हातसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 22:37 IST2021-01-18T22:36:40+5:302021-01-18T22:37:22+5:30
श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथक दाखल

प्रातांधिकारी यांच्या घरी चोरट्यांची हातसफाई
धुळे : उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी भीमराज दराडे यांचे बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. सकाळी ही घटना लक्षात येताच शहर पोलिसांच्या पथकाने धाव घेतली. त्या पाठोपाठ श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथक दाखल झाले होते. दराडे बाहेरगावी गेल्यामुळे नेमका किती आणि कोणता ऐवज चोरीला गेला हे समजू शकलेले नाही. शहर पोलीस ठाण्यात मात्र नोंद घेण्यात आली आहे. शहरातील गणपती मंदिर रस्त्यावरील अंध शाळा आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानासमोर उपजिल्हाधिकारी यांचे निवासस्थान आहे. यात प्रांताधिकारी भीमराज दराडे यांचे शिवनेरी नावाचे शासकीय निवासस्थान आहे. हाच बंगला चोरट्याने लक्ष्य केला. प्रांताधिकारी दराडे हे नगर येथे त्यांच्या भाचीच्या लग्नासाठी शुक्रवारपासून गेलेले आहेत. त्यांच्या कार्यालयातील शिपाई हे त्यांच्या शासकीय बंगल्यात दिवा लावण्यासाठी सायंकाळी येत होते. रविवारी सायंकाळी दिवा लावून शिपाई निघून गेला. पहाटेच्या सुमारास चोरट्याने हा बंगला लक्ष्य करून हातसफाई केली. बंगल्यातून नेमका कोणता आणि कितीचा ऐवज गेला, हे ते आल्यानंतरच समजू शकणार आहे.
त्यांच्या शासकीय निवासस्थानाजवळच निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे शासकीय निवासस्थान आहे. शिवनेरी बंगला फोडल्याची घटना गायकवाड यांना कळाली. गायकवाड हे बंगल्याच्या मागील बाजूस गेले असता वॉलकंपाऊंडला मोठी शिडी लावलेली दिसून आली. सायंकाळी त्या ठिकाणी शिडी नव्हती. अचानक शिडी आली कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शहर पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर पथक दाखल झाले होते. चोरट्याने घरातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे आढळून आले. एक सुटकेस चोरट्याने उघडली असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. या घराच्या समोरच अपर पोलीस अधीक्षक यांचेदेखील शासकीय निवासस्थान आहे. या ठिकाणी पाेलिसांचा बंदोबस्त असतो. तरीदेखील चोरट्याने शिताफीने हातसफाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.