२१ तोळे सोन्यावर मारला चोरट्यांनी डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:24+5:302021-06-20T04:24:24+5:30
देवपुरातील घटना देवपुरातील वाडीभोकर रोडवरील रामनगर प्लॉट नंबर ५७ येथे सुनंदा भांडारकर यांचे वास्तव्य आहे. त्यांचे पती अभियंता होते. ...

२१ तोळे सोन्यावर मारला चोरट्यांनी डल्ला
देवपुरातील घटना
देवपुरातील वाडीभोकर रोडवरील रामनगर प्लॉट नंबर ५७ येथे सुनंदा भांडारकर यांचे वास्तव्य आहे. त्यांचे पती अभियंता होते. त्यांची मुलगी वलवाडी शिवारातील चावरा हायस्कूलजवळ राहते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्या आपल्या मुलीकडे गेलेल्या होत्या. भांडारकर यांच्या घराला कुलूप असल्याने चोरट्याने ही संधी साधली. चोरट्याने दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत शोध शोध केली. त्यांच्या पाच खोल्यातील देवघरात असलेल्या ३२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, चार तोळ्याची पोत, अडीच तोळ्याचे दोन नेकलेस, दोन तोळेची चैन, दोन तोळे कानातले, चार तोळ्याचा राणीहार, तीन तोळे वजनाच्या दोन अंगठ्या आणि कानातले काप, असा सुमारे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, आठ ते दहा हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे.
भांडारकर हे सकाळी घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा आणि कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी ही बाब आपल्या जावयाला कळविली. त्यांनी पश्चिम देवपूर पोलिसांना सांगितले. चोरी झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ ठसे तज्ञही दाखल झाले. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
वेल्हाणे येथील घटना
धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे संदिप भिमसिंग महाले (२५) या तरुणाने तालुका पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत घराच्या जिन्याच्या वरच्या बाजुने चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत घरातील लोखंडी कपाटातील एक तोळे वजनाची सोनपोत, सोन्याची अंगठी आणि ११ हजाराची रोकड असा एकूण ५६ हजाराचा ऐवज घेऊन चोरट्याने पोबारा केला. घरातील मंडळी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे कळताच धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.