दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले
By देवेंद्र पाठक | Updated: November 13, 2023 15:56 IST2023-11-13T15:52:28+5:302023-11-13T15:56:08+5:30
सुरत बायपासवरील महिंदळे शिवारात असलेल्या संबोधीनगरजवळ एकलव्य सोसायटीत राहणारे रोहिदास फकीरा भील (वय ६२) यांनी फिर्याद दाखल केली.

दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले
धुळे : बंद घराचा फायदा उचलत चोरट्याने ३ लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज शिताफीने लांबविला. एका वेळेस तीन घरांत चोरट्याने हातसफाई केली. ही घटना धुळे तालुक्यातील महिंदळे शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात दुपारी उशिरा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरत बायपासवरील महिंदळे शिवारात असलेल्या संबोधीनगरजवळ एकलव्य सोसायटीत राहणारे रोहिदास फकीरा भील (वय ६२) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रोहिदास भील हे आपल्या परिवारासोबत बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. शिवाय त्यांच्या घराला लागून असलेली दोन्ही घरेदेखील बंदच होती. ही संधी चोरट्याने साधली. घराला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरातील कपाटही फोडले. भील यांच्या घरासह तीन घरांवर चोरट्याने डल्ला मारला.
चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज शिताफीने लांबविला. कमी-अधिक प्रमाणात तीन घरांत चोरट्याने हातसफाई केल्याचे समोर आले आहे. चोरीची ही घटना शनिवारी सायंकाळी ७ ते रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. परिवार घरी परतल्यानंतर घरात आणि गल्लीत दोन अशा तीन ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती धुळे तालुका पोलिस ठाण्यात कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथकही दाखल झाले होते. याप्रकरणी रविवारी दुपारी पावणेचार वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक व्ही. यू. जाधव घटनेचा तपास करीत आहेत.