धुळे जिल्हयातील जैताणे येथे चोरांनी एकाच दिवशी चार दुकाने फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:07 IST2020-08-13T12:06:35+5:302020-08-13T12:07:03+5:30
सुमारे एक लाखाचा मुद्देमाल लंपास, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

धुळे जिल्हयातील जैताणे येथे चोरांनी एकाच दिवशी चार दुकाने फोडले
आॅनलाइन लोकमत
निजामपूर (जि.धुळे) : साक्री तालुक्यात जैताणे येथे शिवाजी रोडवरील मध्यवर्ती भाजीमार्केट चौकात चोरांनी एकाच दिवशी चार दुपाने फोडून सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान एकाच दिवशी झालेल्या या चोऱ्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे. दुकानांच्या शटरांची कुलुपे तोडून रोख रकमा आणि माल लंपास केल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले आहे
गावातील शिवाजी रोडवरील कृषी सेवा केंद्र, साडी दुकान, सबमर्सिबल मोटार दुकान, मेडिकल दुकानाचे कुलुपे तोडून चोरट्यांनी हातसफाई केलेली आहे.चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी दुकानाबाहेरील वीज प्रवाह बंद केला.तसेच हायमास्टही बंद असल्याने, चोरट्यांचे फावले होते.
चोरांनी सर्वप्रथम समर्थ कृषी सेवा केंद्राचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील कांदा पिकाचे तणनाशक,किटकनाशक,व ८ हजार रूपये रोख असा एकूण २७ हजाराचा ऐवज लंपास केला. त्यानंतर समोर असलेले बळवंत एकनाथ पाटील (रा.समता नगर वासखेडी रोड, जैताणे) यांचे मंगल कापड कलेक्शन दुकानाचे शटरचे कुलूप तोडून साड्या व पाच हजार रूपये रोख असा एकूण २० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्यांच्या दुकानाच्या डाव्या बाजुस असलेले युवराज गंगाराम शिरोडे (रा.आखाडे रोड जैताणे) यांच्या मालकीचे किसान सबमर्सिबल दुकानाचे लोखंडी शटरला लपवलेले कुलूप तोडून पाण्याची मोटार, दोन स्टार्टर असा एकूण ११ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
तर शिवाजी रोडवरील राकेश अभिमन गवळे यांचे मालकीचे गीताई मेडीकल अँड जनरल स्टोअर्सच्या गल्यामधील ३३,हजार रूपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी केली. याप्रकरणी धनंजय सखाराम न्याहाळदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.