कँटीनमध्ये शिरलेल्या चोरट्याला रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 22:57 IST2021-02-01T22:57:09+5:302021-02-01T22:57:26+5:30
हा प्रकार सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडला.

कँटीनमध्ये शिरलेल्या चोरट्याला रंगेहाथ पकडले
धुळे : शहरातील मुख्य बसस्थानकातील कँटीनमध्ये चोरी करून पळणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हा प्रकार सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडला. कँटीनचे छत तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केल्याचे तपासणीतून समोर आले. बसस्थानकातील कँटीन आशिष कायस्थ यांनी चालविण्यास घेतली आहे. सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास कँटीनच्या वर चढून सिमेंटचा पत्रा तोडून विनोद राजेंद्र पाटील (वय २४, रा. महेश्वर कॉलनी, चितोड रोड, धुळे) हा संशयित तरुण खाली उडी मारुन आतमध्ये शिरला. चोरट्याने सुरुवातीला नाश्ता केला. चॉकलेटच्या बॉक्समधून चाॅकलेट खाल्ले. नंतर आतमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. डीव्हीआर, एलसीडी टीव्ही, गल्ल्यातील १५ हजार रुपये रोख घेवून तो बाहेर पडला. बसस्थानकातील दोन स्पिकर तोडून ते सुध्दा त्याने चोरुन घेतले. ही चोरी करुन तो पळून जाण्याच्या तयारीत असताना बसस्थानकातील पोलीस चौकीतील पोलिसांना तो चोरटा दिसला. त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले. एक ते दीड वर्षांपूर्वी याच संशयित विनोद पाटील याने अशाच प्रकारची चोरी केल्याचे समोर आले आहे. तेव्हा कुटुंबीयांनी विनवण्या केल्याने तो सुटला होता. पुन्हा चोरी करताना रंगेहाथ सापडला आहे. चोरट्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.