धुळ्यात भरदिवसा चोरट्याने दुकानात मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:30 IST2019-11-05T11:30:29+5:302019-11-05T11:30:48+5:30
चिल्लर लंपास : भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

धुळ्यात भरदिवसा चोरट्याने दुकानात मारला डल्ला
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरातील गल्ली नंबर चार मधील जुगल वस्त्रालय शेजारी असलेल्या एका दुकानात हातसफाई करीत दोन ते तीन हजाराची चिल्लर लंपास केल्याची घटना सोमवारी भरदिवसा घडली़ या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
शहरातील गल्ली नंबर ४ मधील परिसरात सकाळपासूनच वर्दळ सुरु झालेली असतानाच चोरट्याने जुगल वस्त्रालयाशेजारी असलेल्या शंकर होम अप्लायन्सेस या दुकानाचे पाठीमागील गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला़ शोधाशोध करुन दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली दोन ते तीन हजाराची चिल्लर एका पिशवीत टाकली़ त्यानंतर चोरट्याने पोबारा केला़ चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराने कैद केलेली आहे़ याच कॅमेरात चोरट्याचा चेहरा देखील स्पष्टपणे दिसत आहे़
दुकान उघडण्यासाठी आलेले दुकानाचे मालक किर्ती शंकरराव मदान यांच्या निदर्शनास ही बाब आली़ त्यांनी या घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना दिली़ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली आहे़ तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे़ भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे.