अवघ्या काही तासात चोरटा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 22:04 IST2020-12-11T22:01:40+5:302020-12-11T22:04:11+5:30

गरुडबागेतील साडेसात लाखांची चोरी : शहर गोपनीय शाखेची कामगिरी, अल्पवयीन मुलाच्या मदतीने मारला होता डल्ला

The thief disappeared in just a few hours | अवघ्या काही तासात चोरटा गजाआड

अवघ्या काही तासात चोरटा गजाआड

धुळे : शहरातील गरुडबाग येथे घरफोडीची घटना घडल्यानंतर एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून अवघ्या २४ तासांत गुन्हा उघड करण्यास शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेला यश मिळाले. चोरट्याला देवपुरातील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. चोरीला गेलेले सात लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिनेदेखील हस्तगत करण्यात पोलिसांना अवघ्या पाच तासात यश आले.
शहरातील गरुडबाग येथे राहणारे चंद्रजित उदय सिसोदे यांच्या ह्यशुभम करोतीह्ण घराचे दार उघडे असल्याची संधी साधत चोरट्याने १५ तोळे वजनाचे सात लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेने तपासाची चक्रे फिरविली. संशयावरून एका अल्पवयीन विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याला त्याच्या पालकाच्या मदतीने विश्वासात घेऊन चौकशी केली. देवपुरातील रमाबाई आंबेडकर नगरात राहणाऱ्या गणेश अनिल मरसाळे याच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. माहिती मिळताच गणेश मरसाळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १५ तोळे वजनाचे सात लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. संशयित गणेश मरसाळे याला अटक करण्यात आली असून, अल्पवयीन बालकाचे समुपदेशन आणि त्याचे पुनर्वसन करण्याबाबत पोलीस निरीक्षक यांना सूचना देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, कर्मचारी भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, सतीश कोठावदे, योेगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रवि गिरासे, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल पाटील, राहुल गिरी, अविनाश कराड, तुषार मोरे, प्रसाद वाघ, विवेक साळुंखे यांनी ही कारवाई केली.
कुत्रा घेण्याच्या मोहापायी एका अल्पवयीन मुलाने गुन्हेगारीचा मार्ग पकडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली़ केवळ एका कुत्र्यासाठी गरुड बागेत घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास केला़ हा ऐवज त्याने रमाबाई आंबेडकर नगरातील त्याच्या साथीदाराला दिला़ पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या पाच तासात या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले़

Web Title: The thief disappeared in just a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे