‘त्यांनी आधी केले आणि मग सांगितले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:16 IST2020-03-15T12:14:49+5:302020-03-15T12:16:30+5:30

जलसिंचन व्यवस्था करुन निसर्गपूर्वक व सेंद्रिय खतांनी फुलविली शेती...

'They did before and then they said' | ‘त्यांनी आधी केले आणि मग सांगितले’

dhule


हर्षद गांधी ।
निजामपूर : शेतीत कष्ट करून आणि स्वत: रासायनिक खते टाळून सेंद्रिय खतांचा वापर करून लावलेली शेती ठरते अनुकरणीय. विविध फळ, फुल झाडे लावून फुलविलेली शेती निश्चितच हेवा करावी अशी आहे. शिवसडे शिवारात जैताणे येथील दुल्लभ माळी यांनी मोठ्या कष्टाने, जिद्दीने आणि आवडीने प्रयत्न करून शेती फुलविली. कृषी मेळाव्यात जेव्हा ते बोलतात तेव्हा वाटते खरच ‘त्यांनी आधी केले आणि मग सांगितले’ हे पटते.
शेताच्या उत्तरेस खुडाणे रस्ता ओलांडून पलीकडे टेकड्यांना जोडणारा बांध गतवर्षी पावसाळ्या पूर्वी लोक सहभागातून घातला. डोंगर दऱ्यात धो-धो पडणारे व रोहिणी नदीत वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून परिसरास जलसिंचन वाढविले. पाणी आडवा, पाणी जिरवा केले. पर्यावरणाच्या दृष्टीने डी.एफ.ओ. धुळे, तहसीलदार, रेंज आॅफिसर आणि ग्रामस्थांच्या सहभागाने विविध प्रकारची ५४० रोपे लावलीत. जिल्हाधिकारी यांनीही येथे येऊन पाहणी केली होती. आता उन्हाळ्यात त्या रोपांना पाणी मिळावे म्हणून ठिबक सिंचन व्यवस्थाही केली आहे. स्वत:च्या शेताबाहेर त्यांनी हे केले आहे ते विशेष महत्त्वाचे ठरते.
शेतीबाहेर आहे गुरांचे शेण साठवणूक व्यवस्था. तेच शेणखत गव्हाच्या शेतात टाकले जाते. कापणीवर आलेले सेंद्रिय गव्हाचे सोन्यासारखे पिवळे धमक वाºया बरोबर डुलतांना दिसते. सेंद्रिय खते लावून आलेले कांदे वर्षभरापासून विनासड घरात साठवलेले दाखविले. आता कांद्याचे रोप तयार करीत आहेत. लगतच्या एक एकरात आहे शेवग्याची शेती आणि त्या लगत लिंबूची ४० झाडे. शेवगा फुलून शेंगा लोंबकळू लागल्यात. आता ते गांडूळ शेतीकडे वळणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना नमूद केले. निसर्गपूरक शेतीतून निरोगी व आरोग्यास विना अपायकारक पिके येतात.
फळ, फुल झाडे फुललीत
या शिवाय शेतात गतवर्षी जांभूळ, आंबा, चिक्कू, आवळ्याची २५ झाडे आणि सागाची ५० रोपे लावलीत. फळांचे नकदी उत्पन्न शेतकºयास बियाणे, मजुरीसाठी उपयोगात येते. १० वर्षांआधीच्या २५ आम्र वृक्षांना मोहोर फुललेत. शेतीच्या बांधावर लावलेले मोरपंखी, चाफा, कण्हेर, बांबू उंच वाढलेत. संरक्षक भिंतच झाली आहे. दुल्लभ माळी हे धुळे जिल्हा भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष आहेत. आता ते येथील शेतकऱ्यांना याद्वारे आणि विविध कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. खरे तर ‘त्यांनी आधी केले मग सांगितले’ याचे ते उदाहरणच आहेत.

Web Title: 'They did before and then they said'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे