शहरात कचऱ्याचे वर्गीकरण नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:23 IST2021-04-03T22:23:18+5:302021-04-03T22:23:34+5:30
घंटागाड्याही नियमीत येईनात

शहरात कचऱ्याचे वर्गीकरण नाहीच
धुळे : शहरातील कचऱ्याच्या वर्गीकरणाकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे.
शहरातील विविध भागातील कचरा संकलित करण्याचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. शासनाने ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, या निर्देशांचे ठेकेदारातर्फे अनेकवेळा पालन केले जात नाही. त्याचबरोबर अनेक भागात घंटागाडीही वेळेवर येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची स्थिती आहे.
शहरातील विविध भागात जमा होणारा कचरा रोज संकलित झाला पाहिजे. डेपोत टाकला गेला पाहिजे. मात्र, अनेकवेळा त्याकडे दुर्लक्ष होते. घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे आवश्यक आहे. कारण ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. तसेच कोरडा कचरा वर्गीकरण करून तो नष्ट करण्यासाठी प्रयत्न होतात; परंतु घंटागाडीत ओला व सुका कचरा एकत्र संकलित केला जातो. घंटागाडीत ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी दोन स्वतंत्र कप्पे असले तरी एकाच कप्प्यात सर्व कचरा टाकला जातो. तसेच अनेक भागात घंडागाडी तीन ते चार दिवसांनी येते. नागरिकांना ओला कचरा तीन ते चार दिवस सांभाळून ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिक हा कचरा सरळ नाला किंवा कचराकुंडीत फेकून देतात. या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मनपा स्थायी समिती सभापतींनी देखील कचरा संकलनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. घंटागाड्या नियमीत येत नसताना लाखोंची बिले कशी अदा केली जातात, अशा शब्दात त्यांनी कचरा संकलनाचा देखावा उघड केला.
शहरातील कचराकुंड्या देखील पूर्ण भरलेल्या असतात. कुंड्यांच्या बाजुला रस्त्यावर कचरा साचतो. दुर्गंधी पसरते. परंतु नियमीत कचरा उचलला जात नाही. लाखो रुपयांचा ठेका देवून देखील धुळे शहराची कचरा संकलनाचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. नागरिकांना दोन ते तीन दिवस कंचरा घरातच ठेवावा लागतो. ही समस्या गंभीर आहे.