थाळनेर ग्रामीण रुग्णालयातील पॅरासिटामॉल (हिवताप) गोळ्यांचा साठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:29+5:302021-08-19T04:39:29+5:30
शासनातर्फे मोफत कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण केले जात आहे. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना थंडी, ताप या गोष्टींचा ...

थाळनेर ग्रामीण रुग्णालयातील पॅरासिटामॉल (हिवताप) गोळ्यांचा साठा संपला
शासनातर्फे मोफत कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण केले जात आहे. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना थंडी, ताप या गोष्टींचा त्रास होत असल्याने रुग्णालयातून लस घेतलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास होऊ नये म्हणून पॅरासिटामॉल गोळ्यांचे वाटप केले जात आहे. परंतु, थाळनेर ग्रामीण रुग्णालयात चक्क पॅरासिटामॉल गोळ्यांचाच साठा संपल्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून पॅरासिटामॉल गोळ्यांची बाहेरून खरेदी करावी लागत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी जर हिवतापाचे मेडिकल लसीकरण धारकांना मिळाले, तर ते हिवताप व अंगपाठ दुखणे किंवा कणकण वाटणे अशा गोष्टींचा त्रास झाल्यावर गोळीचे सेवन करून आराम मिळू शकतो. जे अशिक्षित आहेत, ते लस घेऊन सरळ घरचाच रस्ता धरतात व कामधंद्याला लागून जातात. मग काही वेळाने त्रास जाणवायला लागत असल्याने खासगी दवाखान्यात जाणे, अशा गोष्टींनी आर्थिक भुर्दंड खावा लागतो. सुशिक्षित लोक त्रासापासून मुक्त होण्यासाठी ते बाहेरून औषध घेऊ शकतात. परंतु, गरीब जनतेचे काय, असा प्रश्न सर्वसाधारण कुटुंबांतून होत आहे.
लसीकरणानंतर नागरिक पॅरासिटामॉल गोळ्या घेण्यासाठी औषध वाटप केंद्राकडे गेले असता औषध वाटप करणारा कर्मचारी तासन-तास मोबाईलवर व्यस्त असल्यामुळे नागरिकांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन मोकळे होत असल्याने नागरिकांना लसीकरणानंतर पॅरासिटामॉल गोळ्या न घेता रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अजूनही काही नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत द्विधा मन:स्थिती आहे. त्यातच लसीकरणानंतर बाहेरून घेतलेल्या गोळ्यांचे रुग्णांवर काही विपरीत परिणाम झाल्यास या घटनेला कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. राजपूत यांच्याशी पॅरासिटामॉल गोळ्यांचा साठा किती व केव्हापासून संपलेला आहे याविषयी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता.