चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्या घटली, पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:17+5:302021-05-05T04:59:17+5:30
धुळे : जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने व कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढल्याने दिलासा ...

चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्या घटली, पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांच्या खाली
धुळे : जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने व कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. २६ एप्रिल ते २ मे या आठवडाभरात पॉझिटिव्हिटी दर ९.३३ इतका कमी झाला आहे. म्हणजेच १०० रुग्णांच्या चाचण्यांपैकी ९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.
मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला होता. कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती तसेच पॉझिटिव्हिटी दरही वाढला होता. मात्र काही दिवसांपासून पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. १ एप्रिल रोजी जिल्ह्यात ३ हजार २६५ कोरोना चाचण्या झाल्या त्यापैकी ५६७ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यावेळी पॉझिटिव्हिटी दर १७.३ टक्के इतका होता. मात्र त्यानंतर चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली होती. तसेच पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. १५ एप्रिल रोजी पॉझिटिव्हिटी दर १२ टक्के इतका होता, तर १ मे रोजी झालेल्या २ हजार ४६८ चाचण्यांपैकी २३८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तसेच पॉझिटिव्हिटी दर ९.६४ इतका कमी झाला आहे.
आरटीपीसीआरचे अधिक अहवाल पॉझिटिव्ह-
जिल्ह्यात सरासरी दररोज तीन ते चार हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. अँटिजेन चाचण्यांच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह येत आहेत.
एकूण आरटीपीसीआर चाचण्यांपैकी १५ ते १८ टक्के अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर ६ ते ९ टक्के इतका आहे. लक्षणे असतील पण अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली, तर आरटीपीसीआर चाचणी करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात टेस्टिंग वाढल्या -
कोरोनाच्या पहिल्या लाटेत धुळे शहर मुख्य हॉटस्पॉट ठरले होते. तसेच तालुक्याच्या ठिकाणीच अधिक रुग्ण आढळत होते. दुसऱ्या लाटेत मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र शहरासोबतच गावे तसेच आदिवासी पाडेही हॉटस्पॉट ठरली आहेत. सर्वाधिक साक्री तालुक्यात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात अधिक चाचण्या करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर आरटीपीसीआरसोबतच अँटिजेन चाचण्याही केल्या जात आहेत.
प्रतिक्रिया -
मागील काही आठवड्यात पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांचे वाढलेले प्रमाण दिलासादायक आहे. ग्रामीण भागात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यासाठी शिरपूर व साक्री येथे प्रत्येकी चार मोबाइल टीम तयार केल्या आहेत. त्यांच्याकडून ग्रामीण भागात तपासणी केली जाते तसेच चाचण्या केल्या जातात.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी