कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 18:18 IST2021-03-15T18:17:43+5:302021-03-15T18:18:47+5:30
धुळ्यातील आढावा बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

dhule
धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी करावी. त्यासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कोविड- १९अंतर्गत होणाऱ्या प्रादुर्भाव प्रतिबंधक करण्यासाठी उपाययोजना बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री सत्तार बोलत होते. जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेने कोरोना विषाणूच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी बजावली होती. तशीच कामगिरी आता बजावणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवत सूक्ष्म नियोजन करीत कृती आराखडा तयार करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. नागरिकांना राज्य शासनाचे नियम पालन करण्यास प्रवृत्त करावे. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती आरोग्य यंत्रणेने ठेवावी. कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवावा. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने लसीकरण करून घेण्याचे आदेश दिलेत.