लळींग घाटातील डोंगराळ भागात भीषण आग, वृक्ष जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 22:35 IST2021-03-28T22:10:16+5:302021-03-28T22:35:58+5:30
आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात

लळींग घाटातील डोंगराळ भागात भीषण आग, वृक्ष जळून खाक
धुळे : शहरापासून जवळच असलेल्या लळींग घाटात रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ आगीचे वृत्त कळताच महापालिकेचा अग्नीशमन बंबाने पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली़ बंब येई पावेतो अनेक वृक्ष जळून खाक झाली़ आगीचे कारण समजू शकले नाही़
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील लळींग शिवारात मोठ्या आकारात कुरण आहे़ याठिकाणी डोंगराळ भाग असून वेगवेगळ्या प्रकारची लहान-मोठी वृक्ष आहेत़ जंगलसदृष्य भाग असल्याने याठिकाणी जाण्यास नागरीकांना मज्जाव करण्यात आला आहे़ रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास लळींग कुरणातील जंगल भागात आग लागल्याचे दिसून आले़ ही आग इतकी मोठी होती की ती दूरवरुन सुध्दा दिसत होती़ लळींग कुरणाला आग लागल्याची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला कळताच घटनास्थळी बंब पोहचला़ पण, आग उंचावर असल्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले़ अखेर तासाभराने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याचे अग्नीशमन विभाग प्रमुख तुषार ढाके यांनी सांगितले़