शिंदखेड्याच्या तहसीलदारांना मुरुम माफियांकडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 22:16 IST2020-09-06T22:15:35+5:302020-09-06T22:16:00+5:30
शासकीय कामांत अडथळा : शिंदखेडा तालुक्यातील हातनूरचे पाच अटकेत

शिंदखेड्याच्या तहसीलदारांना मुरुम माफियांकडून धक्काबुक्की
शिंदखेडा : मुरुम उपसा करणारे जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर पकडल्यानंतर तहसीलदार सुदाम महाजन यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी १० ते १२ जणांविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ ही घटना दोंडाईचा रोडवर ६ सप्टेंबर रोजी पहाटे घडली़ गुन्हा दाखल होताच शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथील ५ जणांना अटक करण्यात आली़
शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन आणि त्यांचे पथक रविवारी पहाटेच्या सुमारास रात्रीची गस्त घालत होते़ वाळू अथवा मुरुमची कोणी चोरी करीत आहेत का याची पडताळणी करीत असताना दोंडाईचा रोडवर मुरुम या गौण खनिजाची उत्खनन आणि वाहतूक करीत असताना तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी मशिन मिळून आले़ त्यांना पकडून ट्रॅक्टर आणि जेसीबीवर कारवाई करण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे घेऊन जात असताना संशयितांनी त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्यावर आडवे उभे केले़ पथकाला पुढे जावू दिले नाही़ एवढेच नाहीतर तिन्ही ट्रॅक्टरमधील मुरुम हे दोंडाईचा रोडवरील हॉटेल हिरकणीच्या आवारात दांडगाई करुन शिवीगाळ करीत उपसा करण्यात आला़ याला विरोध होताच शिवीगाळ करण्यात आली़ तिन्ही ट्रॅक्टर पळवून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला़ हा प्रकार रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडला़
यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली़ याप्रकरणी किशोर महादू पाटील, शरद महादू पाटील यांच्यासह तीन ट्रॅक्टरचे मालक, जेसीबीचा चालक व मालक यांच्यासह १० ते १२ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़
गुन्हा दाखल होताच शिंदखेडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित किशोर महादू पाटील (४३), शरद महादू पाटील (४०), सचिन बन्सीलाल पाटील (२३), रावसाहेब कौतिक पाटील (३०), संदिप साहेबराव पाटील (२९) (सर्व रा़ हातनूर ता़ शिंदखेडा) या पाच जणांच्या मुसक्या आवळत सकाळी ११ वाजेलाच अटक करण्यात आली़ सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत़