शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 21:07 IST2019-11-24T21:07:07+5:302019-11-24T21:07:26+5:30
सनियंत्रण सभेत प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांचे प्रतिपादन

शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत
आॅनलाइन लोकमत
धुळे :अध्ययन आणि अध्यापक अधिकाधिक सोपे व्हावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजे. शिक्षकांनी शिक्षण सोपे करण्यासाठी राबविलेले प्रयोग अभिमानास्पद आहे. अशा उपक्रमशील शिक्षकांचे अनुकरण इतरांनी करावे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांनी येथे केले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेत संनियंत्रण सहविचार सभा झाली. त्यावेळी प्राचार्या डॉ. पाटील बोलत होत्या. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रतिभा भावसार, जयश्री पाटील, विजय गायकवाड उपस्थित होते.
यावेळी निष्ठा आणि शगुणोत्सवाची माहिती देण्यात आली. तसेच तालुकानिहाय शैक्षणिक कामांचा आढावा घेत पुढे काय, यावर चर्चा करण्यात आली. चारही तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय शैक्षणिक कामांची माहिती सादर केली. त्यात तालुक्यात राबवण्यात येणारे विविध उपक्रम, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रस्नेही शिक्षकांचे सुरू असलेले कार्य, सौरशाळा, डिजिटल शाळा व या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम याची तालुक्यातील स्थितीची मांडणी करण्यात आली.शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी विशेष कायार्चे सादरीकरण केले. सहविचार सभेसाठी चारही तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक आदी उपस्थित होते.