शिक्षकाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:50 IST2018-02-22T18:49:18+5:302018-02-22T18:50:41+5:30
दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरण : अज्ञात नराधमासह संशयित फरार

शिक्षकाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : येथील बालिका अत्याचार प्रकरणी अटकेत असलेले माजी बांधकाम सभापती व शिक्षक महेंद्र आधार पाटील यांना पोलिसांनी धुळे सेशन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली.
दोंडाईचा पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अटकेत असलेले शिक्षक व माजी बांधकाम सभापती महेंद्र आधार पाटील यांची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपणार होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी पोलिसांनी त्यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश संभाजी ठाकरे यांनी दोन्ही बाजुच्या वकीलांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य पाच आरोपी अद्याप फरार आहे. त्यात माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ.रवींद्र देशमुख, प्रतिक महाले, नगरसेवक नंदू सोनवणे आणि बालिकेवर अत्याचार करणारा मुख्य अज्ञात संशयित आरोपी याचा समावेश आहे.
गुन्ह्यातील फरार संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे दोन पथक हे बाहेर गावी गेलेले आहे. ते अद्याप परतलेले नाही.