लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे येथील चहा विक्रेत्याचा मुलगा मंत्रालयात अधिकारी झाला आहे. २०१८ मध्ये महाराष्टÑ लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात उच्च अधिकारी म्हणून येथील पवन खलाणे याची निवड झाली आहे. सतत आठ वर्षांपासून प्रयत्न करून त्याने हे यशाचे शिखर गाठले आहे.कापडणे येथील पवन दिगंबर (खलाणे) माळी याने नुकत्याच नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात घवघवीत यश मिळविल्याने संपूर्ण गाव परिसरात आनंद व्यक्त होत आहे.पवन हा राज्यात ओबीसी प्रवर्गातून दुसरा तर सर्वसाधारण प्रवर्गातून १५ वा आला आहे. जिद्द, अभ्यासातील सातत्य, चिकाटी व प्रतिष्ठेवर यश कसे खेचून आणता येऊ शकते, हे येथील पवन खलाणे याने महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे मंत्रालयात अधिकारी बनून सिद्ध केले आहे. एका चहा विक्रेताचा मुलगा मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हे पवन खलाणे याने दाखवून दिले. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून आपले ध्येय गाठताना पवनला गेल्या आठ वर्षात तब्बल सात वेळा यशाने हुलकावणी दिली. मात्र तो हिंमत हरला नाही.
चहा विक्रेत्याचा मुलगा मंत्रालयात अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:27 IST