जिल्ह्यात केवळ दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:06+5:302021-05-11T04:38:06+5:30
मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहे. याचा परिणाम पाणीटंचाई ...

जिल्ह्यात केवळ दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा
मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहे. याचा परिणाम पाणीटंचाई मुक्ततेवर झालेली आहे. २०१९च्या मे महिन्यात जिल्ह्यातील १२४ गावांसाठी तब्बल ८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र यावर्षी दिलासादायक स्थिती आहे. मे २०२१च्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात फक्त दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील कामपूर व साक्री तालुक्यातील मळगाव डोमकाणे या दोन गावांचा समावेश आहे. दरवर्षी शिंदखेडा तालुक्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ सोसावी लागते. मात्र गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे अमरावती प्रकल्प, वाडीशेवाळी धरण भरलेले असल्याने, या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न काहीसा मिटलेला आहे.
२९ विहिरी अधिग्रहित
२०१९ मध्ये टँकरप्रमाणेच तब्बल २५० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र यावर्षी फक्त २९ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात शिंदखेडा तालुक्यात ८, शिरपूर तालुक्यात ३, धुळे तालुक्यात ७ व साक्री तालुक्यात ११ विहिरींचा समावेश आहे. दरम्यान, अजून काही गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यामुळे जूनपर्यंत आणखी २०-२५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील.
पाण्यासाठी भटकंती संपली
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात स्त्री- पुरुषांना आपले कामेधंदे सोडून तळपत्या उन्हात, रात्री केव्हाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र अनेक गावांमध्ये बघावयास मिळत होते. मात्र यावर्षी ती परिस्थिती अजिबात नाही. काही गावांना पाणीपुरवठा उशिरा होत असला तरी टंचाई मात्र नाही ही दिलासादायक बाब आहे.
२०१९मध्ये भीषण दुष्काळ
२०१९मध्ये जिल्ह्यात भीषण दुष्काळ होता. यावर्षी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा व विहीर अधिग्रहित करणे यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च झाला होता. हा आतापर्यंतचा पाणीपुरवठ्यावरील सर्वाधिक खर्च असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात दोन वर्षांपासून झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी फारशी पाणीटंचाई नाही. आजच्या स्थितीत जिल्ह्यात फक्त दोन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा असून, २९ विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत.
एस. बी. पढ्यार,
कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, धुळे