स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्रेरणा निर्माण केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:56+5:302021-02-05T08:46:56+5:30
शिरपूर येथील आर.सी. पटेल महाविद्यालयात "जगद्गुरू स्वामी विवेकानंद" या विषयावर ऑनलाइन व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्रेरणा निर्माण केली
शिरपूर येथील आर.सी. पटेल महाविद्यालयात "जगद्गुरू स्वामी विवेकानंद" या विषयावर ऑनलाइन व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.. डी.आर.पाटील होते. डॉ. गिरासे पुढे म्हणाले, राष्ट्रभक्तीचे दुसरे नाव स्वामी विवेकानंद. त्यांनी आधुनिक काळात जगद्गुरूबाबत भारताची संकल्पना मांडली. देशातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्य व शिक्षण ही समाजविकासाची प्रमुख साधने असून तळागाळातील समाज व महिलांना विकासाची संपूर्ण संधी देणे गरजेचे असल्याचे सांगून देशातील स्त्रिया वैज्ञानिक व आधुनिक शिक्षण घेऊन उन्नत झाल्या, तर त्यांच्या मुलाबाळांकरवी देशाचे भविष्य उज्ज्वल होणार, तरच या देशात विद्या, ज्ञान, भक्ती, शक्ती इत्यादी बाबींची जागृती होणार आहे. स्वामीजींनी सांगितलेले राष्ट्रनिष्ठा, धार्मिक सहिष्णुता, सद्भावना, परसेवा तत्परता, सत्य, सेवा, त्याग, समर्पण, नैतिकता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, गरजू व पीडितांची सेवा आदी मानवतावादी व लोकशाही मूल्यांचे संस्कार व चिंतन लहान मुले तसेच युवकांच्या मनावर शाळा, महाविद्यालयांतून होणे गरजेचे आहे. युवकांनी वर्तमान परिस्थितीत समाजात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार
आचरणात आणावे.
प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील म्हणाले की, आपल्या भाग्याचे आपणच निर्माते म्हणून युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या क्रांतिकारी व प्रेरणादायी विचारांचा अभ्यास करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गोपाल बिडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा. अनिता जाधव यांनी मानले.