शहर पोलिसांच्या सतर्कतेने सुरतच्या बालिका पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 19:39 IST2020-12-07T19:39:25+5:302020-12-07T19:39:42+5:30
लग्नाच्या उद्देशाने आल्या धुळ्यात, मुलाने नकार दिल्याने झाली फसगत

शहर पोलिसांच्या सतर्कतेने सुरतच्या बालिका पालकांच्या स्वाधीन
धुळे : लग्नाच्या उद्देशाने सुरत येथून धुळ्यात पळून आलेल्या दोन बालिकांना शहर पोलिसांनी सुखरुप पालकांच्या स्वाधीन केले. दोन्ही बालिका रविवारी रात्री शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील एका कोपऱ्यात बसलेल्या पोलिसांना दिसून आल्या. पोलिसांनी देखील त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांची समजूत घालत शहर पोलीस ठाण्यात त्यांना आणले. रात्रभर त्यांना पोलीस ठाण्यात थांबवून त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. पालक आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
सुरत येथील कोरली गावातील एका १४ वर्षीय बालिकेचे परिसरातील एका तरुणासोबत मैत्री होती. हळूहळू त्याचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणाने बालिकेला लग्नाचे स्वप्न दाखविले. परिणामी पळून जावून लग्न करण्याचे ठरविण्यात आले. दोघांची तारीख ठरली. त्यानुसार त्या बालिकेने पळून जाण्याची तयारीही केली. ६ डिसेंबर रोजी सकाळी त्या बालिकेचे आई-वडील कामाला गेले असता घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्या बालिकेने मामाच्या १२ वर्षीय बालिकेला आपल्या सोबत घेतले. दोघांनी सुरत येथील बसस्थानक गाठले. दोन्ही बालिका या धुळ्याकडे येणाऱ्या बसमध्ये बसल्या. मात्र ऐनवेळी त्या मुलाने नकार दिला. पण, मुली या बसमध्ये बसून गेल्यामुळे त्या धुळ्यात पोहचल्या. त्यांना धुळ्यात येताना रात्र झाली होती. धुळ्यात तर येवून गेलो. पण, पुरेसे पैसे नसल्याने पुन्हा सुरत जायचे कसे? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. दोन्ही बालिका या बसस्थानकातील एका कोपऱ्यात बसून राहिल्या. बसस्थानकात कर्तव्यावर असलेले बालमुकुंद दुसाने आणि रणजीत वळवी यांना एका कोपऱ्यात दोन बालिका चिंताग्रस्त स्थितीत दिसून आल्या. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ बसस्थानक गाठत त्या मुलींची चौकशी केली. त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. जेवणही दिले. त्यांना विश्वासात घेत सर्व माहिती जाणून घेतली. तो पर्यंत त्यांच्या पालकांनाही बोलावून घेण्यात आले. सोमवारी सकाळी पालक आल्यानंतर सर्व सोपस्कार पार पाडत त्यांच्या स्वाधीन केले. मुलींना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते.