पुरवठा विभागात तक्रारींना केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:09 IST2020-03-19T13:09:34+5:302020-03-19T13:09:56+5:30
गोताणे ग्रामस्थांचे निवेदन : दरमहा तक्रारी करुनही रेशन दुकानावर कारवाई नाही

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील गोताणे येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १४० या रेशन दुकानाविरुध्द गावकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आठ वर्षांपासून होत आहेत़ गेल्या वर्षभरापासून दरमहा तक्रारींची संख्या वाढली आहे़ असे असताना पुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे़
गेल्या सोमवारी गोताणे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांच्या नावे निवेदन दिले़ जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी निवेदन स्विकारले़ निवेदनाची एक प्रत तहसिलदारांनाही देण्यात आली आहे़ निवेदनात म्हटले आहे की, रेशन दुकानदाराची दमदाटी वाढली आहे़ ग्राहकांशी हुज्जत घालून त्यांना हाकलून लावण्याचे प्रकार वाढले आहेत़ धान्य वितरीत करण्याच्या तीन ते चार दिवस अगोदर बायोमेट्रीक प्रणालीवर रेशनकार्ड धारकांचे ठसे नोंदवून घेतले जातात़ रात्री बेरात्री धान्य वितरीत केले जाते़ ठरलेल्या कोट्याप्रमाणे माल दिला जात नाही़ दिलेल्या मालाची पावती मिळत नाही़ घरातच दुकान चालविले जाते़ दुकानाचे बोर्ड नाही, भावफलक नाही, स्टॉक बोर्ड नाही, अशा प्रकारे सर्रासपणे गैरव्यवहार आणि धान्याचा काळाबाजार सुरू आहे़ याबाबत गावकºयांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार, पुरवठा निरीक्षक वसईकर यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहेत़ परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही़ दुकानदाराकडून त्याच्या मर्जीप्रमाणे जबाब लिहून त्याला वाचविण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी, कर्मचारी करीत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे़
सदर रशेन दुकानावर त्वरीत योग्य ती कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा झुलाल उत्तम पाटील, जिभाऊ महारु पाटील, पंढरीनाथ राजाराम पाटील, झुलाल निंबा पाटील, आनाजी बुधा पाटील, किसन नथ्थु पाटील, दिपक राजधर पाटील यांच्यासह गावकºयांनी दिला आहे़