कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी केंद्रावर दहावीची परीक्षा झाली नाही. धुळे जिल्ह्यातून दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर १६ जुलै २१ रोजी निकाल जाहीर झाला. त्यात २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर ४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. न
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेला २२ पासून सुरुवात झाली. ८ ॲाक्टोबरपर्यंत ही परीक्षा सुरू राहील. या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमाचे ४ तर जुन्या अभ्यासक्रमाचे १७ असे एकूण २१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. जिल्ह्यात धुळ्यातील दोन व साक्री, शिंदखेडा व शिरपूर येथील प्रत्येकी एकेका केंद्रावर परीक्षा होत आहे.
बुधवारी मराठीचा पेपर होता. केंद्रावर एक बाक सोडून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. पहिला पेपर सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी व निरंतर शिक्षणाधिकारी यांचे पथक तैनात करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.