नकाणे तलावात तरुण-तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:54 IST2023-03-31T20:54:17+5:302023-03-31T20:54:24+5:30
एका तरुण-तरुणींने शहरानजीक असलेल्या नकाणे तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

नकाणे तलावात तरुण-तरुणीची आत्महत्या
धुळे :
एका तरुण-तरुणींने शहरानजीक असलेल्या नकाणे तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांना माहिती मिळताच पट्टीच्या पोहोणाऱ्यांनी तरुणाला बाहेर काढण्यात यश मिळविले तर मुलीचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. दरम्यान, दोघांची ओळख पटलेली नव्हती. घटनास्थळी गर्दी झाली होती.
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे शहरानजीक नकाणे तलाव आहे. याठिकाणी अनेक तरुण-तरुणी फिरत असतात. नेहमीप्रमाणे एक तरुण-तरुणी नकाणे तलाव परिसरात फिरत असताना अचानक दोघांनी हातात हात घेऊन तलावात उडी घेतली. आवाज आल्याने आणि कोणीतरी पाहिल्याने या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.
माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहोणाऱ्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलाला पाण्याबाहेर काढले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, तर रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध सुरू होता. रात्री उशिरापर्यंत दोघांचीही ओळख पटलेली नव्हती. तपास सुरू असल्याची माहिती धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.