शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र अंमलबजावणी करणारी यंत्रणा शासनाच्या योजनांचा कसा बट्याबोळ करते, आरोग्य विभागच जनतेच्या व रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ करते, स्वच्छतेचे धडे देणारे डॉक्टर स्वच्छतेविषयी किती बेफिकीर असतात,याचे जिवंत चित्र जि.प. अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटीदरम्यान उघड्या डोळ्यांनी अनुभवले. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रात पसरलेली घाण, रुग्णांची अव्यवस्था पाहून आश्चर्य व्यक्त केले. लगेच पत्रकारांना आरोग्य केंद्रात पाचारण केले व संपूर्ण अव्यवस्थेची कल्पना देऊन दोषींवर कारवाईचे संकेत दिले. जि.प. अध्यक्ष यांच्या भेटीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलिमा देशमुख व डॉ.चेतना महाले उपस्थित होत्या. जि.प. अध्यक्षांनी केंद्रातील रजिस्टरवर नोंदी केल्या. यावेळी सहा.लिपिक योगेश गुरव व स्वीपर दादासाहेब नगराळे अनुपस्थित आढळून आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी गुरव व नगराळे वारंवार अनुपस्थित असतात अशी तक्रार केली. वापर केलेली औषधी, इंजेक्शन्स इतरत्र फेकलेली होती. शौचालयाचा दरवाजा तुटलेला होता. अशा वातावरणात रुग्ण बरा होण्याऐवजी जास्त आजारी पडेल. यावेळी श्याम पाटील, भागवत पवार,राज निकम उपस्थित होते. आता दोषीवर कोणती कारवाई होते. याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अश्या प्रकारच्या चुका पुन्हा नव्याने होणार नाहीत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलिमा देशमुख यांना अध्यक्षांनी सांगितले.
बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राला जि.प.अध्यक्षांची अचानक भेट, कर्मचारी गैरहजर, कारवाईचे दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST