मजुरांच्या टेम्पोला अचानक आग सुदैवाने जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:21 IST2020-05-10T22:20:28+5:302020-05-10T22:21:04+5:30
नगावबारी परिसर : वाहनाचे प्रचंड नुकसान

मजुरांच्या टेम्पोला अचानक आग सुदैवाने जीवितहानी टळली
धुळे : मजुरांना मुंबई येथून गोरखपूरकडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धुळ्यानजिक नगावबारीजवळ अचानक आग लागली़ घटना लक्षात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली़ यात वाहनाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़
मुंबईहून गोरखपूरकडे जाणारा एमएच ०४ डीडी ६३१४ क्रमांकाचा मिनी टेम्पो मुंबई आग्रा महामार्गाने मजुराना घेऊन जात होता़ या टेम्पोमध्ये १३ जण बसलेले होते़ धुळ्यानजिक नगावबारीजवळ हा टेम्पो आल्यानंतर रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास टेम्पोला आग लागत असल्याचे चालकाच्या लक्षात आले़ प्रसंगावधान राखून चालकाने वाहन थांबवून वाहनातील सर्वांना बाजूला सरकावले़ त्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा पोहचली नाही की जीवितहानी झाली नाही़ आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे टेम्पो मात्र जळून खाक झाला़ या वाहनात ८ मोठे आणि ५ लहान मुले होती़
घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला कळविण्यात आली़ शहरातील अडथळे पार करीत अग्नीशमन बंब घटनास्थळी पोहचला़ फायरमन अमोल सोनवणे, संतोष शिरसाठ, जितेंद्र सरोदे यांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली़ यावेळी महामार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती़