विद्यार्थ्यांना लागला विज्ञानाचा छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:38 IST2019-05-11T22:37:40+5:302019-05-11T22:38:19+5:30
उपक्रम । घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे उन्हाळ्याच्या सुटीत सुरू केला विज्ञान छंद वर्ग

dhule
धुळे : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांनीही वेगवेगळे प्रयोग स्वत: हाताळावेत, ते करावेत यासाठी घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे उन्हाळी विज्ञान छंद हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमामुळे इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी विविध प्रयोग हाताळत असून, त्यांना विज्ञानाचा छंद लागलेला आहे.
काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, सर्वांनाच प्रयोग करण्याची संधी मिळत नाही. तर काही शाळांमध्ये विज्ञान प्रयोगाच्या उपकरणाची वानवा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ‘प्रयोग’ बघावे लागतात. उन्हाळ्याची सुटी लागली की अनेकजण गावी जातात तर काहीजण घरातच मोबाईल गेम खेळण्यात मग्न असतात. या मिळालेल्या सुटीचा सदुपयोग व्हावा यासाठी घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे उन्हाळी विज्ञान छंदवर्ग हा उपक्रम राबविण्यात येतो. या संस्थेत घासकडबी विज्ञान प्रयोगिका आहे. २००८पासून इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान छंद उपक्रम राबविण्यात येतो. सात दिवसाच्या कालावधीत विद्यार्थी स्वत: लहान, लहान प्रयोग करीत असातत. यात दोलकाचा दोलन काळ काढणे, श्वसनातून सीओटू वायू बाहेर पडतो हे पडताळणे, वेगवेगळ्या तापमानाच्या पाण्याचे तापमान तापमापीच्या साह्याने मोजणे, सुक्ष्म दर्शकाच्या साह्याने परागकणांचे निरीक्षण करणे, गोलाकार वस्तूमुळे पदार्थांचे घर्षण कमी होते हे पडताळून पाहणे, पाईपातून वर चढणारा ब्रश, दोऱ्याने ग्लास उचलणे, रांगाची गाळणी बनविणे, पिंजºयातील पोपट, पाण्यात जाणारा मासा असे विविध प्रयोग करण्यात येतात. तसेच या उपक्रमांतर्गत मजा गंमत म्हणून काही खेळ देखील घेण्यात येतात. यात गोलाकार फिरून उभी राहणारी बाटली, नाव, गाव, फळ,फूल, चित्र जोडणे, विद्यार्थी ग्रिटींगही तयार करीत असतात.
देशबंधू मंजूगुप्ता फाऊंडेशनतर्फे मिळालेली फिरती प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना दाखविण्यात येते. यात न्युटनची चकती, रंगीत सावल्या, परिदर्शिका, पाण्याचा जादुई नळ, जडत्वाचा सिद्धांत, वर्तुळ आणि चेंडू, क्रिया प्रतिक्रिया, तरंगणारा पंखा, चक्रीवादळ, सौर प्रकाश, डीएनए रचना प्रतिकृती असे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात येतात. विद्यार्थ्यांमध्येही विज्ञान प्रयोगाची प्रचंड आवड निर्माण झालेली आहे. विविध प्रयोग स्वत: हाताळत असल्याने, त्यांना विज्ञानाची माहिती तर होतेच, शिवाय त्यांना आनंदही घेता येत असतो. एका बॅचमध्ये जवळपास १५-१० विद्यार्थी सहभागी होतात. त्यांना दोन तासांचा अवधी दिला जात असतो. मात्र अनेक विद्यार्थी तेथून जाण्यासही तयार नसतात. या विद्यार्थ्यांना दीपाली दाभाडे व ललित कुळकर्णी हे मार्गदर्शन करतात. हा सर्व उपक्रम घासकडबी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शहा, सचिव नरेंद्र जोशी, खजिनदार श्रीराम देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.