रेमेडिसीवीरची ज्यादा किमतीत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST2021-04-04T04:37:26+5:302021-04-04T04:37:26+5:30
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे ठरत असलेले रेमेडिसीवीर इंजेक्शन कमी किमतीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे ...

रेमेडिसीवीरची ज्यादा किमतीत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे ठरत असलेले रेमेडिसीवीर इंजेक्शन कमी किमतीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. खरेदी किमतीवर १० टक्के नफा आकारून रेमेडिसीवीरची विक्री करावी, असे आवाहन त्यांनी औषध विक्रेत्यांना केले आहे.
प्रश्न - सध्या जिल्ह्यात किती रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत ?
उत्तर - जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. सध्या २ हजार ५८० इंजेक्शन उपलब्ध आहेत. टप्प्या - टप्प्याने इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. शुक्रवारी २ हजार ४०० तर शनिवारी ४०० इंजेक्शन प्राप्त झाले. सलग सुट्या आल्याने उत्पादकांकडून इंजेक्शन प्राप्त झाली नव्हती. आता मात्र नियमित पुरवठा होणार असल्याचे उत्पादकांनी सांगितले आहे.
प्रश्न - रेमेडिसीवीर इंजेक्शन कोणकोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत ?
उत्तर - कोविड रुग्णालय, कोविड केंद्र याठिकाणी प्राधान्याने रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यातील शासकीय कोविड रुग्णालय व कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध आहेत. औषध विक्रेत्यांकडे सध्या कमी प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडे इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.
प्रश्न - रेमेडिसीवीर किती रुपयांना उपलब्ध आहे ?
उत्तर - एम.आर.पी. किमतीवर रेमेडिसीवीर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. काही इंजेक्शनची विक्री १ हजार २०० तसेच काहींची ९०० रुपयांना विक्री होते आहे. विक्रेत्यांनी खरेदी किमतीवर १० टक्के नफा घेऊन रेमेडिसीवीर इंजेक्शनची विक्री करावी. कमी किमतीत इंजेक्शनची विक्री करावी, यासाठी औषध विक्रेत्यांच्या संघटनेशी सातत्याने चर्चा सुरू आहे. लवकरच सध्या विक्री होत असलेल्या किमतीपेक्षाही कमी किमतीत रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध होईल.
या क्रमांकावर करा तक्रार -
जास्त किमतीत रेमेडीसीवीरची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा सहा. आयुक्त जाधव यांनी दिला आहे. जे विक्रेते लूट करत असतील अशा विक्रेत्यांची तक्रार १८०० २२२ ३६५ व ०२५६२ २३४६२४ या क्रमांकावर करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ज्यादा किंमत आकरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार -
खरेदी किमतीवर १० टक्के रक्कम आकारून विक्रेत्यांनी रेमेडिसीवीर इंजेक्शनची विक्री करावी. त्यापेक्षा जास्त किमतीत इंजेक्शनची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. रुग्णांची लूट करणाऱ्या औषध विक्रेत्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. प्रसंगी त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.
ऑक्सिजन खरेदीसाठी परवाना -
धुळे शहरातील एका कंपनीकडून ऑक्सिजनचा पुरवठा होतो आहे. १३ टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची या कंपनीची क्षमता आहे. सध्या जिल्ह्यात ११ ते १२ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्या पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होतो आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नजीकच्या काळात इतर जिल्ह्यांतून ऑक्सिजन मागवावा लागणार आहे. त्यासाठी इतर जिल्ह्यांतून ऑक्सिजनची खरेदी करून पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना परवाने देणार आहोत. इच्छुकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क करावा.