तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:50 IST2019-12-01T21:50:14+5:302019-12-01T21:50:39+5:30
मेथी येथील घटना : आरोपीच्या अटकेसह खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तणाव
शिंदखेडा : तालुक्यातील मेथी येथील एका विवाहित तरूणाचा लटकलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. तरूणाची आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय तरूणाच्या वडीलांसह नातेवाईकांनी व्यक्त केला. आरोपींच्या अटकेसह त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आल्याने गावात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान एका हॉटेलमध्ये बिलावरून त्याचे भांडण झाले होते. त्यातून ही घटना घडल्याची गावात चर्चा सुरू आहे.
शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील राकेश सरदारसिंग गिरासे (३०) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे़ तालुक्यातील मेथी गावाच्या फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री राकेश हा गेला होता़ यावेळी बिलावरुन त्याचे आणि हॉटेल मालकाचे भांडण झाले असल्याची परिसरात चर्चा आहे़ या भांडणानंतर राकेश हा घरी न जाता गावात सुरु असलेल्या तमाशाच्या कार्यक्रमासाठी निघून गेला़ भांडण झाल्यामुळे संतापात असलेल्या हॉटल मालकासह दोन ते तीन जण राकेशच्या घरी रात्री उशिरा पोहचले़ त्यांनी मुलाला आवरुन घेण्याचा सल्ला राकेशच्या वडिलांना दिला आणि तेथून ते तमाशाच्या ठिकाणी पोहचले़ याठिकाणी पुन्हा राकेश आणि हॉटेल मालक यांच्यात भांडण झाल्याची परिसरात चर्चा सुरु आहे़
नेहमीप्रमाणे राकेशचे वडील सरदारसिंग गिरासे हे पहाटे ५ वाजेच्या सुमारास गाईचे दूध काढण्यासाठी आपल्या शेतात गेले़ याठिकाणी पुन्हा तो हॉटेलचा मालक आणि सोबत एक जण त्यांच्या शेतात आले आणि राकेश घरी आला की अशी विचारणा करु लागले़ यावर गाईचे दूध काढल्यानंतर घरी गेल्यावर पाहतो आणि सांगतो, असे राकेशच्या वडिलांनी सांगितल्याने आलेले हे दोघे तिथून निघून गेले़ नेहमीप्रमाणे सरदारसिंग यांनी गाईचे दूध काढल्यानंतर त्यांच्या शेताच्या बाजुला कपाशीच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोराने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्यांना एक तरुण दिसला़ त्यांनी जवळ जावून कोण आहे याची खात्री केल्यानंतर आपला मुलगा असल्याचे लक्षात येताच त्यांनी हंबरडा फोडला़ आरडा ओरड केल्याने गावकरी जमा झाले़
घटनेची माहिती शिंदखेडा पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिसांचे पथक आल्यानंतर आपल्या मुलाचा कोणीतरी घातपात केल्याचा संशय त्याच्या वडिलांसह नातेवाईकांना यावेळी केला़ जो पर्यंत आरोपीला अटक करीत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह झाडावरुन खाली काढू देणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला़ परिणामी बराच काळपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ त्याचा कोणीतरी घातपात केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला़
घटनास्थळी गर्दी वाढत असल्याने शिंदखेडा पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविता येत नसल्यामुळे धुळ्याहून पोलिसांची तुकडी मागविण्यात आली़ शेवटी सामोपचारानंतर तरुणाचा मृतदेह झाडावरुन खाली उतरविण्यात आला़ त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला़ तेथेही संबंधितांना अटक करुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी लावून धरण्यात आली़ याठिकाणीही पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ शेवटी त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्याचा मृतदेह धुळ्यात आणण्यात आला़ दरम्यान, राकेश याच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या घरावर शोककळा पसरली आहे़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता़
धुळ्याहून पोलिसांना केले पाचारण
घटनेचे गांभिर्य ओळखून शिंदखेडा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने स्वत: दाखल झाले होते़ पोलिसांनी संशयित लोटन गोपीचंद वाघ याला सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे़ मयत तरुण हा दोन बहिणींचा एकुलता होता़ त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे़ अकस्मात निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़