शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत कामकाज बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:49+5:302021-03-09T04:38:49+5:30
धुळे तालुक्यातील सोनगीर आणि शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना या प्रकल्पात ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत कामकाज बंद ठेवा
धुळे तालुक्यातील सोनगीर आणि शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गेलेल्या आहेत. सदर भूसंपादित झालेल्या अथवा होऊ घातलेल्या जमिनींचा बाजारभावाप्रमाणे त्वरित मोबदला शेतकऱ्यांना अदा करण्यात यावा. शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतजमिनीवरील फळबागांची, पिकांची नुकसान भरपाई देखील अदा व्हावी. यासंदर्भात वेळोवेळी निवेदनदेखील देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी, अडचणी या लक्षात न घेता शेतकऱ्यांना त्यांची मोबदला रक्कम अदा न करता मनमानी पध्दतीने सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे कामकाज जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अदा करणे, त्यानंतर योजनेचे काम सुरू करणे न्यायाचे ठरणार होते. मात्र तसे न करता जिल्हा प्रशासन आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
उपसा सिंचन योजनेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत अथवा बाधित होणार आहेत त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेत जमिनीवरील फळबाग अथवा पीक याचीही नुुकसान भरपाई देण्यात यावी. जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत योजनेचे काम बंद ठेवण्यात यावे. पूर्तता करणे शक्य नसल्यास सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी कसण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच पीक पेऱ्याच्या नोंदी मिळकतीचा अधिकार अभिलेख सदरी घेण्याबाबत संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत. अन्यथा, १० मार्चपासून सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथील कामकाज बंद करून ठिय्या आंदोलन सुरू करावे लागेल, असा इशारा देण्यात आला.