पडताळणीच्या घोळामुळे ६ महिन्यांपासून रॉकेल पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:57 IST2019-05-21T11:57:19+5:302019-05-21T11:57:49+5:30
शिरपूर तालुका : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ४२ हजाराहून अधिक लाभार्थी वंचित

dhule
शिरपूर : तालुक्यात ४२ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना गेल्या ६ महिन्यांपासून हक्काच्या केरोसीनपासून वंचित राहण्याची वेळ प्रशासकीय पडताळीच्या घोळात अडकलेली आहे़ गत आॅक्टोंबर २०१८ मध्ये लाभार्थ्यांनी हमी पत्र दिल्यानंतरही केवळ दोनदा केरोसीन मिळाले़
राज्य शासनाने आॅगस्ट २०१८ मध्ये परिपत्रक काढून गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांनी हमीपत्र सादर केल्यास त्यांना पूर्ववत केरोसीनचा पुरवठा केला जाणार असल्याचे सुचित केले होते़ त्यामुळे अर्धघाऊक विक्रेते कानुमाता आॅईल डेपोमार्फत ७ हजार ६८८, सिध्दिविनायक सिध्देश्वर आॅईल डेपोमार्फत १२ हजार ५९५, विखरण येथील बी़एच़पवार यांच्याकडून ६ हजार ८३६, सांगवी येथील शनैश्वर आॅईल डेपोकडून ८ हजार ३७८, थाळनेर येथील एम़एस़दर्डा यांच्याकडून ६ हजार ९१४ असे एकूण ४२ हजार ४११ शिक्षा पत्रिकाधारकांनी आॅक्टोंबर २०१८ मध्ये तहसिलदारांकडे हमीपत्र सादर केले आहे़ त्याकरीता ७२ हजार लिटर केरोसीनची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे करण्यात आली होती़ ते प्राप्त होताच वाटप करण्यात आले़ नोव्हेंबरमध्ये २४ हजाराची मागणी केल्यानंतर ते केरोसीन जानेवारीत मिळाले़ त्यामुळे डिसेंबर ते आतापावेतो असे सहा महिन्यांपासून लाभार्थी करोसीनपासून वंचित आहेत़
जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी २ एप्रिल २०१९ रोजी काढलेल्या स्मरणपत्रात, जानेवारी २०१९ मध्ये केरोसीन मागणीत तालुक्यात हमीपत्रांची संख्या ३ हजार ६५८ दाखविण्यात आली होती. मात्र पडताळणीत प्रमाणित न केलेल्यांची संख्या ८ हजार ३४४ अशी आढळल्यामुळे ४ हजार ६८६ हमीपत्रामध्ये तफावत आढळून आली आहे़ असे असतांना देखील केरोसीन लाभार्थ्यांचे हमीपत्रांची तलाठी/मंडळ अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करून संबंधित तहसिलदारांनी सदर हमीपत्रावर प्रमाणित स्वाक्षरी करून सुधारीत फेरतपासणी अहवाल ७ दिवसाच्या आत मागविला होता़ अन्यथा पात्र केरोसीन लाभार्थ्यांची कोणतीही केरोसीन न मिळाल्याची तक्रार असल्यास तहसिलदार यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल असे देखील सूचित करण्यात आले असतांना देखील त्या पत्राकडे कानाडोळा केल्यामुळे केरोसीन धारक वंचित राहीलेत़
पुर्ववत केरोसीनचा पुरवठा न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा
आमदार अमरिशभाई पटेल यांनी येथील तहसिल प्रशासनाकडे शिधा पत्रिकाधारकांना केरोसीन वेळेवर देण्याची मागणी केली आहे़
शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनने सुध्दा १५ मे रोजी प्रांताधिकायांना निवेदन देवून हमीपत्रानुसार केरोसीन मिळण्याची मागणी केली आहे़ हमीपत्र देवून ही केवळ दोनदा केरोसीन मिळाले आहे़ त्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून लाभार्थी केरोसीनपासून वंचित आहेत़
*प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सुध्दा या संदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले़ या प्रकाराला केवळ प्रशासकीय दिरंगाई कारणीभूत असून सर्वसामान्य नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला आहे़ आपल्यास्तरावर हमीपत्रांची पडताळणी बाकी असल्यामुळे केरोसीनची मागणी केली जात नाही़ त्यामुळे पडताळणीसाठी झालेला उशीर हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे़ पडताळणी पूर्ण करून तातडीने केरोसीन उपलब्ध करून द्यावे़ तसे न झाल्यास २७ मे पासून तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे तालुकाप्रमुख ईश्वर बोरसे यांनी दिला आहे़