संभाजीनगरातून चोरलेली बस धुळ्यात हस्तगत
By अतुल जोशी | Updated: February 5, 2024 18:51 IST2024-02-05T18:50:48+5:302024-02-05T18:51:17+5:30
ही बस शहरातील चाळीसगाव रोड चौफुली जवळील विठ्ठल नगरातून ताब्यात घेण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संभाजीनगरातून चोरलेली बस धुळ्यात हस्तगत
धुळे : छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केलेली खासगी बस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी जप्त केली. या बसची किंमत ५ लाख रुपये असून, ही बस शहरातील चाळीसगाव रोड चौफुली जवळील विठ्ठल नगरातून ताब्यात घेण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस निरीक्षक शिंदे यांना ४ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून विठ्ठल नगरमध्ये असलेली एमएच २० डी. डी. १९५ या क्रमांकाच्या बसची खात्री करण्यात आली. यावेळी आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर बसची किंमत ५ लाख रुपये असल्याचे समजले. ही बस चोरीस गेल्याची नोंद छत्रपती संभाजीनगर मधील सिडको पोलिस ठाण्यात झाली असल्याने धुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेली बस पुढील तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, संजय पाटील, शाम निकम, मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, संतोष हिरे, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी व योगेश साळवे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली.