राज्यसीमा बंद; ई-पास नावालाच, कोणीही यावे, टिकली मारून जावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:33 IST2021-04-26T04:33:05+5:302021-04-26T04:33:05+5:30
धुळे : राज्यसीमा बंद असल्या तरी महामार्गावरून विना ई-पास येणाऱ्या खासगी वाहनांचे प्रमाण वाढले असून चोख बंदोबस्त असल्याने या ...

राज्यसीमा बंद; ई-पास नावालाच, कोणीही यावे, टिकली मारून जावे!
धुळे : राज्यसीमा बंद असल्या तरी महामार्गावरून विना ई-पास येणाऱ्या खासगी वाहनांचे प्रमाण वाढले असून चोख बंदोबस्त असल्याने या वाहनांना परत जावे लागत आहे. किती प्रवासी परत गेले याची नेमकी आकडेवारी पोलिसांकडे नसली तरी शेकडो वाहने दररोज परत पाठविली जात आहेत.
धुळे जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सीमा सील केली आहे. याशिवाय दुर्गम भागातील चोरट्या मार्गांनी प्रवासी राज्यात प्रवेश करू नयेत यासाठी सीमावर्ती भागातील सातही रस्ते शिरपूर पोलिसांनी बंद केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या सातही सीमा सील केल्याने चोरून प्रवेश करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. सातही सीमांवर चोख बंदोबस्त लावला असून २५ पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
अत्यावश्यक कामासाठी ई-पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याने अनेक वाहने परत जात आहेत. केवळ मालवाहतुकीला परवानगी आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या देखील कोरोनाच्या संसर्गामुळे कमी झाली आहे. त्यामुळे महामार्गांवर वर्दळ नसल्याचे चित्र आहे.
सात सीमा; २५ कर्मचारी
धुळे जिल्ह्याला लागून महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा आहे. शिरपूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागात सात सीमा आहेत. या सर्व सीमा प्रशासनाने सील केल्या आहेत. सर्व सीमांवर शिरपूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. प्रवेश दिला जात नाही.
शिरपूर तालुक्यात सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत मालकातर, बिजासन, हेंदऱ्यापाडा, वरला, हिवरखेडा, बोरपाणी, गुराळपाणी अशा सात सीमांवर २५ पोलीस कर्मचारी तैनात आहेत. होमगार्डची देखील मदत घेतली आहे.
जीवनावश्यक वस्तूंची आणि इतर मालाची वाहतूक करणारी वाहने वगळून अन्य वाहनांना राज्यात प्रवेशबंदी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न करता रक्तदान करून घेतले जात आहे.
साक्री रोड बायपास
धुळे शहरालगतच्या महामार्गांवर केवळ मालवाहू वाहने जाताना दिसत आहेत. सुरत हायवेवरून जाताना मालवाहू ट्रक.
नगावबारी
मुंबई-आग्रा महामार्गावरून येणारी काही खासगी वाहने अत्यावश्यक कामासाठी नगाबारी येथून शहरात प्रवेश करताना दिसत आहेत.
चाळीसगाव चाैफुली
मालेगाव, चाळीसगावकडून येणारे रस्ते शहरात एकत्र येतात, त्या चाळीसगाव चाैफुलीवर वाहनांची वर्दळ कायम असते.