हाफ तिकिट पडतंय महाग, धुळे बसस्थानकावरुन एकाच दिवशी तीन महिलांच्या सोनपोत लांबविल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 17:44 IST2023-05-15T17:44:29+5:302023-05-15T17:44:45+5:30
महिला प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

हाफ तिकिट पडतंय महाग, धुळे बसस्थानकावरुन एकाच दिवशी तीन महिलांच्या सोनपोत लांबविल्या
राजेंद्र शर्मा
धुळे : महिला हाफ तिकिट वर्ष बस प्रवासाच्या सवलतीमुळे महिला प्रवासाची संख्या वाढल्याने चोरट्यांची मजा झाली आहे. सोमवारी सकाळी चोरट्यांनी तब्बल तीन महिलांच्या सोनपोत लांबविल्या. यामुळे महिला प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
राज्य सरकारने सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्केे सवलत जाहीर केली आहे. तेव्हापासून महिला प्रवाश्यांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा चोर घेताना दिसत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून सोनपाेत चोरी होण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. सोमवारी सकाळी सोनपोत चोरीच्या तीन घटना घडल्या. यात सकाळी साडेनऊ वाजता जयश्री शिवाजी निळे (वय ३२, रा. पोलिस लाईन, धुळे) या महिलेची ४ ग्रॅम वजनाची सोनपोत चोरट्याने लांबविली. त्या धुळे - धमणार - साक्री बसने प्रवास करीत होत्या.
तर अश्विनी भूषण खैरनार (वय २०, रा. मोहाडी उपनगर, धुळे) या अमळनेर - वापी बसने प्रवास करीत असताना त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोनपोत लंपास झाली. तर तिसऱ्या घटनेत मनिषा भाऊसाहेब भोसले (वय ४०, रा. लोंढे, ता. चाळीसगाव) या महिलेची ३ ग्रॅम वजनाची सोनपोत चोरीस गेली आहे. त्या धुळे - धमणार - साक्री बसने प्रवास करीत होत्या. दरम्यान सायंकाळपर्यंत शहर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती. मात्र या घटनेनंतर चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.