एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:07+5:302021-09-23T04:41:07+5:30
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, एसटीची आंतरजिल्हा सेवेसोबतच आता परराज्यातही सेवा सुरू झाल्याने, प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. धुळे ...

एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, एसटीची आंतरजिल्हा सेवेसोबतच आता परराज्यातही सेवा सुरू झाल्याने, प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. धुळे आगारातून तूर्त गुजरात राज्यासाठीच बससेवा सुरू असून, मध्य प्रदेशसाठी अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत, आंतरजिल्ह्यासह आंतरराज्य बससेवाही बंद झालेली होती. बससेवा बंद असल्याने, प्रवाशांना चांगला फटका बसला होता. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हळूहळू बससेवा सुरू झाली. आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली, तरी आंतरराज्य बससेवा सुरू झालेली नव्हती. त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. मात्र, आता आंतरराज्य बससेवा सुरू झाल्याने, प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.
दरम्यान, मध्य प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून, मध्य प्रदेशसाठीही बससेवा तत्काळ सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे.
सूरत गाड्या फुल्ल
धुळ्याहून गुजरात, मध्य प्रदेशला जाण्यासाठी रेल्वे सेवा नसल्याने, प्रवाशांना एसटीने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. या भागातील अनेक नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त सूरतला स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे धुळे, तसेच इतर आगारांतून सूरतला जाणाऱ्या सर्वच बसगाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.
बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण
एसटीच्या चालक, वाहकांना वेगवेगळ्या गावांना जावे लागते, तसेच त्यांचा प्रवाशांशी नेहमीच संपर्क येत असतो. त्यामुळे चालक, वाहकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांसाठीही लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. धुळे आगारातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचेही लवकरच लसीकरण होईल.
परराज्यात जाणाऱ्या बसेस
-धुळे-सूरत
धुळे-वापी
धुळे-बडोदा
धुळे-अहमदाबाद
शिंदखेडा-सूरत
शिरपूर-सूरत
गुजरात सुरू, मध्य प्रदेशची प्रतीक्षा
धुळे आगारातून सूरत, वापी, बडोदा या गुजरात राज्यासाठी बससेवा सुरू झालेली आहे. मध्य प्रदेशसाठी अद्याप बससेवा सुरू झालेली नाही.
- स्वाती पाटील, आगार प्रमुख, धुळे.