सलाईपाडा शिवारातून दीड लाखांचे स्पिरीट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 22:03 IST2021-03-27T22:02:57+5:302021-03-27T22:03:04+5:30
छापा पडताच संशयित फरार

सलाईपाडा शिवारातून दीड लाखांचे स्पिरीट जप्त
धुळे : शिरपूर तालुक्यातील सलाईपाडा रस्त्यालगत कुळाच्या झोपडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून १ लाख ४० हजार रुपयांचे स्पिरीट जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली. छापा पडताच संशयित फरार झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी शिवारात सलाईपाडा रस्त्यावर कुळाच्या झोपडीत अवैधरित्या मद्यसाठी असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार, पथकाने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छापा टाकला. पथकाला पाहताच मद्यसाठ्याचा मालक हा घटनास्थळावरुन पळून गेला आहे. या झोपडीत असलेले स्पिरीटचा साठा जप्त करण्यात आला. त्यात १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे २०० लिटर क्षमतेचे १२ प्लस्टिकचे ड्रम, ६ हजार रुपये किंमतीचे २०० लिटर क्षमतेचे स्पिरीटने भरलेला ड्रम, २०० हजार रुपये किंमतीचे २०० लिटर क्षमतेचे दोन ड्रम असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एम. पी. पवार, ए. यू. सूर्यवंशी, प्रशांत तडवी, तुषार देशमुख, किशोर गायकवाड, एस. एम. गोवेकर, ए. बी. निकुंबे, एस. एच. देवरे, के. डी. वराडे, गोरख पाटील, केतन जाधव, भाऊसाहेब पाटील, दारासिंग पावरा, रविंद्र देसले यांनी ही कारवाई केली.