भरधाव वाहनाने उडवले, अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, चालक फरार
By देवेंद्र पाठक | Updated: November 21, 2023 16:11 IST2023-11-21T16:10:43+5:302023-11-21T16:11:53+5:30
नगाव शिवारातील घटना

भरधाव वाहनाने उडवले, अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, चालक फरार
देवेंद्र पाठक, धुळे : मुंबर्ब आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील नगाव येथील गंगामाई शाळेसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अनोळखी पादचाऱ्यास धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. फरार चालकाविरोधात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
धुळे तालुक्यातील नगाव शिवारात मुुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या गंगामाई शाळेसमोरील रस्त्याने एक ४५ वर्षीय अनोळखी इसम पायी जात असताना भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अनोळखी पादचाऱ्यास मागावून जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. अपघाताची ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी नगाव गावाचे पोलिस पाटील सुनील रणसिंग मोरे (वय २७) यांनी दिलेल्या माहितीवरून सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फरार वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. पी. गायकवाड करीत आहेत.