दिव्यांग मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम, घरोघरी जाऊन होणार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:38+5:302021-07-11T04:24:38+5:30
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या १ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात ...

दिव्यांग मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम, घरोघरी जाऊन होणार नोंदणी
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या १ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अचूक व शुद्ध करण्याची कामे सुरू आहेत. या तारखेला वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा दिव्यांग नागरिकांना मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी व जिल्ह्यातील सर्व पाचही विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांमध्ये सर्व पात्र दिव्यांग नवमतदारांच्या नावनोंदणीसाठी ही मोहीम राबविण्यात येईल.
या मोहिमेच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेटी देऊन दिव्यांग नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, तसेच मतदार यादीमधील नोंदणीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, सुविधा व साहाय्य उपलब्ध करून देतील. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा दिव्यांग नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा आवश्यक कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करून, आपल्या नावाची नोंद मतदार यादीमध्ये करावी. ज्या दिव्यांग मतदारांचे मतदार यादीमधील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता, नातेवाइकाचे नाव आदी माहितीमध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे, अशा मतदारांनीही दुरुस्तीचा अर्ज क्रमांक ८ भरून आवश्यक कागदपत्रासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
मतदारांच्या माहितीसाठी धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे नाव, मतदान
केंद्र आणि संपर्क क्रमांक असलेली विधानसभा मतदार संघनिहाय यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदार, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संघटनांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरी भेट देतील, त्यावेळी अचूक माहिती द्यावी व मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
दिव्यांग प्रकारामध्ये चिन्हांकितसाठीही संधी
ज्या दिव्यांग मतदारांच्या नावाची नोंद मतदार यादीमध्ये झालेली आहे, परंतु त्यांच्या नावाची नोंद दिव्यांग प्रकारामध्ये चिन्हांकित झालेली नाही, अशा मतदारांनी दिव्यांग प्रमाणपत्रासह अर्ज क्रमांक ८ भरून द्यावेत. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिकांच्या नावांची नोंद मतदार यादीमध्ये होऊन त्यांची नावे दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित झाल्यास, भविष्यात होणाऱ्या निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या प्रकारानुसार आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देणे सोयीचे होईल.