कोरोना लसीकरणासाठी विशेष अभियान राबवा! जिल्हाधिकारी : टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST2021-09-24T04:42:30+5:302021-09-24T04:42:30+5:30
जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती ...

कोरोना लसीकरणासाठी विशेष अभियान राबवा! जिल्हाधिकारी : टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या सूचना
जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, लसीकरण अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. कोविड लसीकरण सर्व लाभार्थ्यांना देऊन त्यांना संरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आयोजित करावा. अन्य विभागांनीही सहकार्य करावे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करला पहिला व दुसरा डोस देण्याची नियमानुसार कार्यवाही करावी. पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे. महानगरपालिका आणि तालुकास्तरावर आढावा बैठक घेऊन लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती द्यावी. १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. दिव्यांग, गंभीर आजारी रुग्ण आणि गर्भवतींसाठी लसीकरण सत्रांचे आयोजन करावे.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे. औद्योगिक वसाहत, गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र लसीकरण शिबिरांचे नियोजन करावे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, धर्मगुरूंची मदत घ्यावी. महाविद्यालयीन स्तरावरही शिबिरांचे नियोजन करावे. त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्रांची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
सहायक जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, गावागावांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे. त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे सहकार्य करण्यात येईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, डॉ. मोरे, डॉ. पाटील यांनी लसीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.