दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा; अपंग कर्मचारी संघटना, विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:39+5:302021-07-09T04:23:39+5:30
धुळे : येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी ...

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा; अपंग कर्मचारी संघटना, विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलवा
धुळे : येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यासाठी सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी यांना निवेदन दिले. दिव्यांग कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक तंत्रज्ञान साधने उपलब्ध करून द्यावी, दिव्यांग कर्मचाऱ्यांची परिगणना करून ३ टक्केप्रमाणे अनुशेष त्वरित भरावा, दिव्यांगांचे स्वतंत्र रोस्टर ठेवून ते अद्ययावत करावे, विभागनिहाय व पदनिहाय स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना ४ टक्केप्रमाणे पदोन्नती देऊन सर्व विभागातील पदोन्नतीच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निवेदन देताना संघटनेच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकला परदेशी, भाऊसाहेब पाटील, कोषाध्यक्ष चत्रू पवार, किशोर भामरे, अमृत जाधव उपस्थित होते.
संघटनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी यांनी सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल, तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक साधने उपलब्ध केली जातील.