The son of a cotton growing farmer called Thats his own textile industry | कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मुलाने थाटला स्वत:चा टेक्सस्टाईल उद्योग
कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मुलाने थाटला स्वत:चा टेक्सस्टाईल उद्योग

बभळाज : येथील स्वप्निल मुरलीधर पाटील या तरुणाने शिक्षणानंतर नौकरी करण्याचा सरधोपट मार्ग नाकारत उद्योग विश्वात पाऊल टाकले आहे़ त्याने इचलकरंजी येथे स्वत:चा टेक्सस्टाईल उद्योग सुरु केला़ त्याच्या या धैर्याचे सर्वत्र कौतूक होत आहे़ यानिमित्ताने आजच्या तरुणांपुढे त्याने एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे़
शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील शेतकरी मुरलीधर शामराव पाटील यांचा स्वप्निल हा मुलगा आहे़ त्याने गावातच १२ वी पर्यंतचे शिक्षण घेवून शिरपूर येथे डिप्लोमा इन टेक्सस्टाईल इंजिनिअरींग शिक्षण घेतले़ त्यानंतर बीटेकचे शिक्षण बंगलोर येथे घेतले़ शिक्षणानंतर अन्य विद्यार्थी हे नेहमीप्रमाणे नोकरीच्या शोधात असतात़ मात्र, स्वप्निलने नौकरीचा शोध केवळ अनुभवासाठी घेतला़ चेन्नई येथे त्याने तीन वर्ष मेहनत घेऊन अनुभव मिळविला़ याशिवाय तिरुपूर, कोईम्बतूर येथील कंपन्यांतून टेक्सस्टाईल व होजिअरीच्या व्यवसायतले बारकावे समजून घेतले़ त्यानंतर स्वत:च्या उद्योगाची तयारी करुन मुहुर्तमेढ रोवली़
फ्रें डस् निटींग टेक्सस्टाईल या व्यवसायाची सुरुवात इचलकरंजी येथे केली़ आजपासून साधारण ३ वर्षापुर्वी सुरु केलेल्या या व्यवसायात त्याने उत्तुंग भरारी घेतली़ ४० लाखांची गुंतवणूक करुन सुरु केलेल्या या व्यवसायात आता दरवर्षी १ कोटी ५० लाखांची उलाढाल होत आहे़ सुमारे ३५ बेरोजगारांना रोजगार दिला असून त्यात ३० कुशल आणि ५ अकुशल कामगार आहेत़ स्वप्निलने व्यवसाय सुरु करताना एक बंद पडलेल्या सहकारी संस्थेच्या उद्योगाचे युनिट भाडेतत्वावर घेतले़ त्यात त्याचा चांगलाच जम बसला असून त्याच्या कारखान्यात टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, ट्रॅक सूट, नाईट वेअर, लेगींग्ज, स्कूल युनिफॉर्म, स्वेटर्स असे विविध प्रकारचे कपडे तयार होत आहेत़ कापड बनविण्याचे मशीन, ४० शिलाई मशिन अशी यंत्रसामुग्री आहे़
इचलकरंजीच का निवडले
या शहराला महाराष्ट्राचे टेक्सस्टाईल हब म्हणून ओळखले जाते़ येथे दरदिवशी या व्यवसायतले १०० कोटीपेक्षा जास्तीचे व्यवहार होतात़ एवढ्या प्रचंड व्याप्ती असलेल्या या शहरात साहजिकच लहान व्यावसायिकांना पूरक, पोषक वातावरण मिळते़ मार्गदर्शनही मिळते़ या व्यवसायतले खरेदीदार व विके्रते येथे सहज मिळतात, म्हणूनच या शहराची निवड करण्यात आली आहे़
प्रेरणा कशी मिळाली
स्वप्निलचे वडील मुरलीधर पाटील हे कापूस उत्पादक शेतकरी आहेत़ त्यामुळे अथक मेहनत करुनही कापूस उत्पादकाचे हाल थांबवावेत यासाठी आपण प्रयत्न केला पाहीजे या विचाराने शिक्षणाची पुढील दिशा ठरविण्यात आली़ त्यातून शिक्षण घेतल्यानंतर चेन्नई, तिरुपूर, कोईम्बतूर येथील कंंपन्यात नौकरी करताना या व्यवसायाची सहजता लक्षात आली़ शक्ती निटींगचा मालक अवघ्या २ शिलाई मशिन्सवर या व्यवसायात उतरला होता़ त्या कंपनीची आजची उलाढाल कोटीची आहे़ या सर्व बाबी व्यावसायिक दृष्टीकोनातून बघितल्या आणि त्याच माझ्या प्रेरणा ठरल्यात असे स्वप्निल सांगतात़
भविष्याचे नियोजन
यापुढे स्थानिक स्वत:च्या गावातच मोठा उद्योग सुरु करायचे स्वप्न आहे़ त्यात स्थानिक तरुणांना, बचत गटाच्या व इतर महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच कापूस उत्पादकाचे हित जोपासणे हे या उद्योगाचे वैशिष्ठ असतील़ उद्योग करुन नफा सर्वच कमवतात़ पण, उद्योगाचा मालक एकटाच असतो़ म्हणून मूळ कापूस उत्पादकांपासून कामगारांपर्यंत सर्वच या उद्योगाचे मालक असावेत, अशी संकल्पना डोक्यात आहे आणि मी लवकरच पूर्ण करण्याचा माझा मानस असल्याचे स्वप्निल पाटील सांगतात़
स्वप्निल हे सध्या स्वत:च्या उद्योगाबरोबर इतर छोट्या उद्योजकांना मार्गदर्शन करत आहे़ अशा अनेक कंपन्या त्याच्या संपर्कात आहेत़ कापड उद्योगामुळे कापूस उत्पादकाला न्याय मिळेल, असा आशावाद त्याने याप्रसंगी बोलताना व्यक्त केला़

Web Title: The son of a cotton growing farmer called Thats his own textile industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.